चला, निवड करू या...मुंबई : मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास जुना आहे. मराठी माणूस देशभर नाटकवेडा म्हणून ओळखला जातो. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांनी रंगभूमी समृद्ध केली आहे. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कारासाठी यंदा चंद्रकांत कुलकर्णी, मुक्ता बर्वे, प्रशांत दामले, पुष्कर श्रोत्री आणि तेजश्री प्रधान यांची नामांकने आहेत. ज्युरी आणि लोकमतच्या वाचकांनी मिळूनच यापैकी कोणता कलाकार तुम्हाला आवडतो, हे ठरवायचे आहे.१) चंद्रकांत कुलकर्णी,मुंबई, वाडा चिरेबंदीचंद्रकांत कुलकर्णी हे दिग्दर्शन, अभिनय, पटकथालेखन क्षेत्रांतील आघाडीचे नाव. कुलकर्णी यांनी नाट्यक्षेत्राची मुहूर्तमेढ औरंगाबादमध्ये रोवली आणि एकांकिका, हौशी व समांतर रंगभूमी गाजवली. जिगीषा या संस्थेद्वारे विविध नाट्याविष्कार घडवले. महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ व ‘युगान्त’ या त्रिनाट्यधारेच्या दिग्दर्शनाद्वारे ते व्यावसायिक रंगभूमीवर आले. त्यांची ‘ध्यानीमनी’ व ‘गांधी विरुद्ध गांधी’ नाटके खूपच गाजली. ‘चाहूल’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘चारचौघी’, ‘मौनराग’, ‘आधी बसू मग बोलू’ यांसह नव्याने रंगभूमीवर आणलेली ‘हमिदाबाईची कोठी’, ‘बटाट्याची चाळ’, ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ अशी ६५ नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. ‘बनगरवाडी’ चित्रपटात अभिनय केला. ‘बिनधास्त’ हा चित्रपट दिग्दर्शित करून त्यांनी येथेही दबदबा निर्माण केला. ‘भेट’, ‘कायद्याचं बोला’, ‘कदाचित’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘दुसरी गोष्ट’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. दूरचित्रवाणीवरील ‘पिंपळपान’ ही मालिका गाजली. २) मुक्ता बर्वे, छापा काटामराठी मनोरंजन क्षेत्रात अमूल्य योगदानाने ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे! ‘घडलंय बिघडलंय’ मालिकेनंतर त्यांनी ‘आम्हाला वेगळं व्हायचंय’द्वारे रंगभूमीवर पाऊल टाकले. ‘चकवा’द्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. ‘थांग’, ‘माती माय’, ‘सुंबरान’, ‘एक डाव धोबीपछाड’, ‘शेवरी’ असे चित्रपट केले. ‘जोगवा’ चित्रपटातील ‘सुली’ने रसिकांना वेड लावले. त्यांनी ‘आघात’, ‘बदाम राणी गुलाम चोर’ असे चित्रपट केले. पण महत्त्वाचे वळण म्हणजे ‘मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट! ‘गोळाबेरीज’, ‘लग्न पाहावे करून’, ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘हायवे’, ‘डबलसीट’ यांतील भूमिकांमुळे कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. ‘फायनल ड्राफ्ट’ नाटकात अफलातून भूमिका रंगवत त्यांनी विविध कंगोरे असलेल्या भूमिकांचा सडा पाडला. ‘छापा काटा’मधील भूमिकेने रसिकांच्या मनावर गारुड केले. ३) प्रशांत दामले, कार्टी काळजात घुसलीएकाच दिवशी पाच आणि एकाच नाटकाचे हजारहून अधिक प्रयोग करून विश्वविक्रम करणारे नाव म्हणजे प्रशांत दामले! ‘टूरटूर’ने हा नट मराठी रंगभूमीला दिला. विनोदी भूमिका हे त्यांचे बलस्थान. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांत संचार. ३२ वर्षांत २७ नाटके, ३७ चित्रपट आणि २४ मालिका अशी कामगिरी त्यांच्या नावावर आहे. चार वेळा लिम्का रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव झळकले आहे. ‘मोरूची मावशी’, ‘ब्रह्मचारी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रीतिसंगम’, ‘पाहुणा’, ‘प्रियतमा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘जादू तेरी नजर’, ‘बहुरूपी’, ‘नकळत दिसले सारे’ अशा नाटकांत दामले यांनी अभिनयाचे रंगदर्शन घडवले. ‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक सध्या ते करत आहेत. त्यांनी अभिनयाची छाप चित्रपटांतूनही पाडली. ‘सवत माझी लाडकी’, ‘सारेच सज्जन’, ‘चार दिवस सासूचे’, ‘धुमाकूळ’, ‘बंडलबाज’, ‘आत्मविश्वास’, ‘पसंत आहे मुलगी’ अशा चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. ‘भिकाजीराव करोडपती’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ अशा मालिकांतूनही त्यांनी काम केले. ४) पुष्कर श्रोत्री, हसवा फसवीमराठी आणि हिंदी चित्रपटांतून अभिनयाचे खणखणीत नाणे आणि विनोदी बाजाच्या भूमिकांसाठी पुष्कर श्रोत्री ओळखला जातो. नाटकातही त्याने दमदार मजल मारली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी ‘हसवा फसवी’ नाटकात साकारलेल्या ६ विविधांगी भूमिकांचे शिवधनुष्य पुष्करने उचलले आणि ‘हम भी कुछ कम नहीं’ याची प्रचिती आणून दिली. ‘मी केलेली सहाच्या सहा पात्रे पुष्करकडे सुरक्षित आहेत हे पाहून समाधान वाटले,’ अशी प्रतिक्रिया दिलीप प्रभावळकर यांनी दिली होती. पुष्कर म्हणतो, अलीकडेच ‘रेगे’ या चित्रपटात त्याने धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका रंगवली. ‘एक डाव धोबीपछाड’, ‘जबरदस्त’, ‘हापूस’, ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘रीटा’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘बदाम राणी गुलाम चोर’, ‘गोळाबेरीज’ अशा चित्रपटांत पुष्करने अभिनयाची कमाल दाखवली. ‘अ पेइंग घोस्ट’ या चित्रपटात त्याने हटके अवतार धारण केला आणि ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातून भूमिका साकारत त्याची ताकद दाखवून दिली. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ असे हिंदी चित्रपटही त्याच्या नावावर आहेत.५) तेजश्री प्रधान, कार्टी काळजात घुसली‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान! तेजश्रीची ही ‘जान्हवी’ खूपच लोकप्रिय झाली आणि तेजश्री रसिकांच्या गळ्यातली ताईत बनली. या मालिकेने तेजश्रीला लोकप्रियता मिळवून दिली असली, तरी तिने तिच्या अभिनयाचा श्रीगणेशा आधीच केला होता. ‘झेंडा’, ‘शर्यत’ अशा चित्रपटांतून दिसलेली तेजश्री प्रधान ‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटातल्या ‘आनंदी’च्या भूमिकेमुळे चर्चेत आली. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत तिच्या नवऱ्याची भूमिका रंगवणाऱ्या अभिनेता शशांक केतकर याच्याशी तिने रिअल लाइफमध्येही विवाह केला. त्यामुळे तिची रील लाइफ स्टोरी प्रत्यक्षातही उतरली. अभिनेता प्रशांत दामले याच्यासह अलीकडे ‘कार्टी काळजात घुसली’मध्ये काम करून तिने रंगभूमीवर पाऊल टाकले. छोट्या पडद्यावरची जान्हवीची लोकप्रियता तिला नाटकातल्या या भूमिकेसाठी कामी आली आणि तिने रसिकांना या नाटकाकडे खेचून घेतले.
कोणता कलाकार सर्वाधिक लोकप्रिय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2016 1:33 AM