नागपूर : सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूशी संबंधित कोणकोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी करून यासंदर्भातल्या याचिकेतील मागणीमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले.
अॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने याचिकेतील मागणी मोघम असल्याचे व मागणीमध्ये कोणकोणती कागदपत्रे सुरक्षित ठेवायची याचा उल्लेख नसल्याचे सांगितले. परिणामी, उके यांनी याचिकेतील मागणी दुरुस्त करण्याची परवानगी मागितली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना मागणी दुरुस्तीसाठी एक आठवड्याचा वेळ देऊन प्रकरणावर दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली. तत्पूर्वी वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांनी सरकारची बाजू मांडताना याचिकेवर आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाने लोया यांच्या मृत्यूशी संबंधित याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे ही याचिका ऐकली जाऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.
लोया यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे झाला असे उके यांचे म्हणणे आहे. अॅड. श्रीकांत खंडाळकर व सत्र न्यायाधीश प्रकाश ठोंबरे यांनी स्वत:च्या मृत्यूपूर्वी लोया यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे झाल्याची माहिती दिली होती. मार्च-२०१५ मध्ये भाजपाच्या एका बड्या नेत्याने अॅटोमिक एनर्जी कमिशनच्या तत्कालीन अध्यक्षाची भेट घेतली होती. त्या बैठकीचा सर्व रेकॉर्ड नष्ट करण्यात आला आहे. लोया यांना रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विष देण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये झाला होता असे संकेत यातून मिळतात. त्या काळात लोया यांच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोललो होतो.
लोया यांनी सोहराबुद्दीन प्रकरणातील मसुदा निर्णयाची खंडाळकर यांना दिल्यानंतर खंडाळकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. तसेच, ठोंबरे यांचा २०१६ मध्ये नागपूर ते बंगळुरू रेल्वे प्रवासादरम्यान संशयास्पद मृत्यू झाला असेही उके यांनी याचिकेत म्हटले आहे.