शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी शिवसेना हिंदुत्वाच्या विचारसरणीपासून फारकत घेत असल्याचा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा दावा खोडून काढला. "कोणते हिंदुत्व तुम्हाला तुमच्या पक्षाच्या पाठीत वार करायला शिकवते. तोही एक पक्ष जो आपल्या कुटुंबासारखा आहे,?” असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. एकनाथ शिंदे आणि अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी भाष्य केलं.
प्रियंका चतुर्वेदी यांना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. "प्रत्येक राजकीय पक्ष मंथनातून जातो आणि ते राजकीय चर्चा कोणत्या दिशेने जाते त्यावर अवलंबून असते. राज्यात राजकीय चर्चा सुरू आहे. पुढे जाण्यासाठी राज्याचा मूड समजून घ्यावा लागेल. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजप जशी होती आता तशी राहिलेली नाही,” असं त्या म्हणाल्या. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
ते कारण नाही…
एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं ते कारण नाही. त्यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महत्त्वाचं खातं होतं. त्यांचा मुलगाही खासदार आहे. शिंदे हे एक ज्येष्ठ नेते आहेत. जे खातं मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवतात ते त्यांना देण्यात आल्याचंही चतुर्वेदी म्हणाल्या. एकनाथ शिंदेंसोबत दिसणाऱ्या लोकांशी आम्ही सातत्यानं संपर्कात आहोत आणि तेही आमच्या संपर्कात आहेत, असं त्या म्हणाल्या.
त्यांनी गुवाहाटीतून चर्चा करण्याऐवजी मुंबईत येऊन चर्चा केली पाहिजे. त्यांनी आमचा सामना केला पाहिजे. त्यांनी परत यावं आणि आम्हाला सांगावं. हे एक आव्हान होतं ज्यानं त्यांचा आणखी बुरखा फाडल्याचंही ते म्हणाले. युतीसाठी आमच्यावर कोणताही निर्णय थोपवला जाऊ शकत नाही. आम्ही त्यांना चर्चेसाठी यायला सांगितलं. परंतु आता यासाठी उशिर झाल्याचंही चतुर्वेदी म्हणाल्या.