मुंबई : भाजपाचे राज्यातील लोकसभा उमदेवार ठरविण्यात राज्यातील कोणत्या मंत्र्यांचा शब्द चालला आणि कोणाचा चालला नाही याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ‘संकटमोचक’ म्हणून अलिकडे ख्याती मिळविलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द त्यांच्याच जळगावमध्ये चालला नाही, पण कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे आपल्या समर्थकास तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे स्वत:साठी उमेदवारी खेचून आणण्यात यशस्वी झाले.भाजपाचे बहुतेक उमेदवार जाहीर झाले आहेत. आता त्यामागे घडलेले पक्षांतर्गत राजकारणही समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, गिरीश महाजन यांनी जळगावच्या उमेदवारीसाठी माजी शासकीय अधिकारी प्रकाश पाटील किंवा पारोळाचे नगराध्यक्ष करण पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र, महसूल मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे हे स्मिता वाघ यांच्या नावासाठी शेवटपर्यंत आग्रही राहिले. शेवटी वाघ यांना उमेदवारी मिळाली.मी यावेळी लोकसभा लढणार, पक्षाला मी तसे सांगितले आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे दोन वर्षांपासून निकटवर्तीयांना सांगत होते. भाजपाचे सहयोगी राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी त्यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केला. पुन्हा खासदारकी मिळविण्याची अनिल शिरोळे यांची इच्छा होतीच. दोघांचे आव्हान परतवून बापट यांनी उमेदवारी मिळविली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, अशी माहिती आहे.माढामधील उमेदवार ठरविताना भाजपाची कसरत अजूनही सुरूच आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे नाव नक्की झाल्याचे वातावरण चारपाच दिवस होते मग ते मागे पडले आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव आले. सुभाष देशमुख विरुद्ध राज्यमंत्री विजय देशमुख हा वाद सोलापूरकरांना नवीन नाही. या वादाची किनार माढातील उमेदवार ठरविण्यासही आहेच. मध्येच सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन यांचे नाव पुढे करण्यात आले. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचे नाव नक्की झाल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, निंबाळकर यांना उमेदवारी मिळतेय असे दिसताच त्यांना विरोध करणारे मेसेज मुंबईतील नेत्यांना पाठविण्याची मोहीमच उघडण्यात आली. त्यामुळे माढाची उमेदवारी मिळाल्याची ‘मंगल’ बातमी निंबाळकर यांना अद्याप मिळालेली नाही.लातूरमध्ये विद्यमान खासदार सुनील गायकवाड आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातून विस्तव जात नव्हता. गायकवाड यांच्या उमेदवारीला निलंगेकर यांनी जोरदार विरोध करीत स्वत:चे समर्थक सुधाकर श्रृंगारे यांचे नाव पुढे केले. शेवटी गायकवाड यांचे तिकीट कापले गेले आणि श्रृंगारे यांना उमेदवारी मिळाली.वर्चस्वावरून पक्षांतर्गत अडवा-अडवीभाजपाचे बहुतेक उमेदवार जाहीर झालेले असताना आता त्या मागे घडलेले पक्षांतर्गत राजकारणही समोर येत आहे. कुठे आमदारांनी खासदारांना फटाके लावले तर कुठे मंत्र्यांनी खासदारकीच्या उमेदवाराची वाट अडविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यावरील वर्चस्वातून हे घडले. वर्चस्वाची ही पक्षांतर्गत लढाई गडचिरोलीपासून माढापर्यंत झाली. लोकसभेला झालेली या अडवा-अडवीचे पडसाद हे विधानसभा निवडणुकीतही उमटू शकतात.गडचिरोलीमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार अशोक नेते यांची उमेदवारी कापण्यासाठी भाजपाच्या दोन आमदारांनी खूप प्रयत्न केले. त्यातील एका आमदारास स्वत: लोकसभेवर जाण्याची फार इच्छा होती. नेते यांच्या विरोधात वातावरण असल्याचे निरोप पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना या ना त्या माध्यमातून देण्यात आले.अकोल्याचे विद्यमान खा. संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी पसरविण्यात आली. पण त्यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेसकडून एका नामवंत मराठा डॉक्टरना उमेदवारी मिळावी व धोत्रे पराभूत व्हावेत यासाठी शिवसेनेच्या एका आमदाराने खूप प्रयत्न केल्याची माहिती आहे.
तिकीटवाटपात कोणत्या मंत्र्यांचा शब्द चालला, कोणाचा पडला?
By यदू जोशी | Published: March 28, 2019 1:47 AM