जळगाव : राजकारणात युती, आघाडी जनतेच्या विकासासाठी करायची असते. आपल्या तुंबड्या भरण्यासाठी, सत्तेच्या दोन खुर्च्या प्राप्त करण्यासाठी नव्हे, हा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिला. मी ३० ते ३५ वर्षांपासून राजकारणात आहे.
विधानसभेच्या सहा निवडणुकांत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढलो त्या पक्षासोबत कोणत्या तोंडाने जायचे आणि जनतेला काय संदेश द्यायचा, हा विचार करून मी शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे, असे पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर हँडलवरून शनिवारी, जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला.
यामध्ये आ. पाटील यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीकडे सामान्य घटना म्हणून पाहू नये, असे म्हटले आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे, कामाचे कौतुक करीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन मतदारसंघातील जनतेला केले आहे.