मुंबई : १९६२ पासून काँग्रेसचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील आलेख सतत वर-खाली राहिला आहे. १९६२च्या निवडणुकीत काँग्रेसचा स्टाइक रेट तब्बल ८१ टक्के राहिला होता. तोच २०१९ मध्ये घसरून तब्बल १५ टक्क्यांवर आला होता. त्याचवेळी १९८० मध्ये १० टक्के असलेला भाजपचा स्ट्राइक रेट २०१९ च्या निवडणुकीत तब्बल ६४ टक्क्यांवर गेल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून समोर येते.
२०१९ मध्ये काय झाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचंड बहुमतासह लोकसभेत सत्ता स्थापन केल्याचा फायदा राज्य भाजपलाही झाला. यावेळी भाजपचा स्ट्राइक रेट थेट ४७ वरून ६४ वर गेला, तर शिवसेनेचाही स्ट्राइक रेट २२ वरून थेट ४५ वर गेला. यावेळी काँग्रेस ३०, तर राष्ट्रवादीही ४४ या स्ट्राइक रेटवर पोहोचली.
२०१४ मध्ये काय झाले?
शिवसेनेचा स्ट्राइक रेट सतत घसरत राहिला. याच वेळी भाजपच्या स्ट्राइक रेटमध्ये ७ टक्क्यांची वाढ झाली. पंतप्रधान मोदींनी एक हाती सत्ता मिळविल्याचा फायदा भाजपला राज्यात झाला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्ट्राइक रेटमध्येही यावेळी घट झाली. भाजपचा स्ट्राइक रेट थेट ४७% वरून ६४% वर गेला.
२००९ मध्ये काय झाले?
काँग्रेसच्या जागांमध्ये यावेळी चांगली वाढ झाली. काँग्रेस जवळजवळ स्थिर राहिली. काँग्रेस-राष्ट्रवादीला २१/११ हल्ल्याचा आणि सत्ताविरोधी लाटेचा थोडा फटका बसला. २००९ ला भाजपच्या जागांत काही प्रमाणात घट झाली होती.
२००४ मध्ये काय झाले?
शिवसेना भाजप यांना अंतर्गत वादाचा फटका. पुणे भूखंड प्रकरणात मनोहर जोशी यांना पदावरून दूर करत त्यांच्या जागी नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. युतीच्या कलहाचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला.
शेतकरी कामगार पक्षाचे काय?
शेतकरी कामगार पक्षाने १९६२ च्या निवडणुकीत १९ टक्के स्ट्राईक रेट मिळविला होता. १९६७च्या निवडणुकीत यात आणखी वाढ होत हा स्ट्राईक रेट ३३ वर पोहोचला. यात वाढ होत १९८५ मध्ये शेकापने ४५ टक्क्यांवर स्ट्राईक रेट मिळवला. त्यानंतर झालेल्या निवडणुकांत मात्र शेतकरी कामगार पक्षाचा स्ट्राईक रेट दरवर्षी कमी होत गेला.