राज्यात भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुण्यात भाजपाची दोन दिवसीय कार्यशाळा आहे, तर राष्ट्रवादीचीही कार्यशाळा सुरु आहे. काँग्रेसमध्येही बैठका सुरु झाल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाने देखील मतदारसंघांनुसार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच महाविकास आघाडीसमोर तीन पक्षांमध्ये जागा वाटप करण्याचे आव्हान असणार आहे. यामुळे येत्या लोकसभेसाठी नव्याने जोडीला आलेला भिडू, ठाकरे गटासाठी या दोन्ही पक्षांना जागा सोडाव्या लागणार आहे. याची चाचपणी सुरु झाली आहे.
गेल्या आठवड्यात तिन्ही पक्षांची एक बैठक झाली होती. यामध्ये लोकसभा, विधानसभा एकत्र लढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता जागावाटपाची बैठक होणार आहे. यामुळे तिन्ही पक्षांनी आपापल्या जागा कोणत्या असतील याची चाचपणी सुरु केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या मतदारसंघांवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदे गटाकडे खासदार गेलेले असले तरी त्या जागांवरही चाचपणीस सुरुवात केली आहे. काँग्रेसनेही गेल्या वेळी त्यांच्या वाटेला आलेल्या जागा परंतू हरलेल्या जागा कोणत्या यावर चाचपणी सुरु केली आहे. यानंतर मविआमध्ये पुन्हा बैठकांचे सत्र सुरु होणार असून त्याद्वारे जागा वाटपांची बोलणी केली जाणार आहेत. शिवसेनेला कोणत्या जागा सोडायच्या यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरु आहेत. अशोक चव्हानांनी याचे संकेत दिले आहेत.
ज्या जागा गेली काही वर्षे जिंकता आलेल्या नाहीत व जिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे, त्या जागा शिवसेनेला सोडल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच एखादी जागा सोडली तर त्या बदल्यात शिवसेनेकडून कोणती जागा घ्यायची यावर देखील रणनिती ठरविली जात आहे. यामुळे येत्या काळात या तिन्ही पक्षांमध्ये तारेवरच्या कसरतीचे राजकारण पहायला मिळणार आहे.