महायुतीला महाराष्ट्रात जबरदस्त बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्री पदावर कोण बसणार यावरून शिवसेना आणि भाजपात पुन्हा रस्सीखेच सुरु झाली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही केल्या मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाहीत. तर बहुमताच्या अगदी जवळ पोहोचलेल्या भाजपाला मुख्यमंत्री पद आपल्याकडे हवे आहे. शिंदेंचे मुख्यमंत्री पद गेले तर ठाकरे पुन्हा डोके वर काढू शकतात असा युक्तीवाद शिंदे गटाकडून सुरु आहे. तसेच शिंदेंच्या नेतृत्वात हा विजय असल्याने शिवसेना हे पद सोडायला तयार होत नाहीय. अशातच फडणवीसांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत.
शिवसेनेने शिंदे उपमुख्यमंत्री पद कदापिही स्वीकारणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. तर महायुतीच्या जागावाटपावेळी भाजपाने शिवसेनेलाच मुख्यमंत्री पद देण्यात येणार असल्याचा शब्द दिल्याचा दावा शिवसेनेचे नेते करत आहेत. शिवसेना आणि भाजपातील ही धुसफुस २०१४ पासून सुरु झाली असून पक्ष फोडूनही मुख्यमंत्री पदावरून या दोन्ही पक्षांमध्ये ती सुरुच राहिली आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ सुत्रांनी आजतकला दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी असे ठरलेले की महायुतीला बहुमत मिळाले व पुन्हा सरकार स्थापन करता आले तर शिवसेनेलाच मुख्यमंत्री पद दिले जाणार होते. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये भाजपा जास्तीत जास्त जागांवर उमेदवार देणार व लढणार असा निर्णय घेतला गेला होता. परंतू, महायुतीत कोण किती जागा जिंकला याला महत्व दिले जाणार नाही. जर महायुतीला बहुमत मिळाले तर शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असे ठरविण्यात आले होते, असा दावा या नेत्यांनी केला आहे.
२०१९ ला देखील तेव्हा अखंड असलेल्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांनी बंद दाराआड मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द दिल्याचा दावा केला होता. परंतू जेव्हा प्रत्यक्ष सरकार स्थापनेची वेळ आली तेव्हा भाजपचाच मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न केला होता. यावरून फडणवीस यांनी आपणाला याची कल्पना नाही असे सांगितले होते. तर अमित शाह यांना विचारले असता त्यांनीही असा कोणताही शब्द दिला नसल्याचे आपल्याला सांगितल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. आता २०२४ ला देखील या दाव्यावरून तसेच घडतेय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.