विनोदवीर कुणाल कामराने केलेल्या विडंबनात्मक टिप्पणीमुळे झालेल्या वादामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या चर्चेत आहेत. कुणाल कामराच्या या टिप्पणीवरून वादाला तोंड फुटलं असून, शिवसैनिक कामराविरोधात आक्रमक आहेत. तर शिंदेंचे कट्टर विरोधक असलेल्या ठाकरे गटाचे नेते कुणाल कामराच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. दरम्यान, कुणाल कामराच्या या विडंबनाची चर्चा सुरू असतानाच एका कार्यक्रमामधील एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा एकनाथ शिंदे यांच्या समोर जय श्रीराम म्हणताना दिसत आहे, तर एकनाथ शिंदेही त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कट्टर हिंदू नावाच्या एका युझरने अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिसत आहेत. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांमधील एका व्यक्तीच्या खांद्यावर बसलेला छोटा मुलगा ‘’ओ साहेब... जय श्रीराम’’, असं म्हणतो. त्यानंतर सभागृहातून जय श्रीरामच्या घोषणांना सुरुवात होते. तसेच एकनाथ शिंदे हेही या मुलाच्या घोषणेवर प्रतिक्रिया देतात आणि हा मुलगा सुद्धा रामभक्त आहे, असं सांगतात.
हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी लाईक केला आहे. तसेच या व्हिडीओ खाली काही लोक जय श्रीराम असंही लिहित आहेत.