सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 04:04 PM2024-06-14T16:04:26+5:302024-06-14T16:05:34+5:30

महायुतीतील हे दोन बडे नेते उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी हे दोन नेते का उपस्थित नव्हते? यासंदर्भात खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे.

While filling the form of Sunetra Pawar; Why not Eknat Shinde devendra Fadnavis Ajit Dada clearly said | सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले

सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी गुरुवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राँष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. महायुतीतील हे दोन बडे नेते उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यावेळी हे दोन नेते का उपस्थित नव्हते? यासंदर्भात खुद्द अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. याशिवाय त्यांनी, छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही भाष्य केले आहे.

शिंदे-फडणवीस का उपस्थित नव्हते? -
अजित पवार म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळची व्यक्ती अमोल काळे, यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अस्तीविसर्जनासाठी त्यांना (देवेंद्र फडणवीस) नाशिकला  जायचे होते. ते गेले दोन-तीन दिवस त्या दुःखात आहेत. याशिवाय, एकनाथ शिंदे यांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो. त्यांना सांगितले की, आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमच्या उमेदवाराचे नाव ठरेल. आम्ही सर्वजण जाऊन तो फॉर्म भरणार आहोत. सर्वांनीच तो फॉर्म भरायला जायला हवे, असे काही मला वाटत नाही. ते म्हणाले हरकत नाही. महायुती तर बरोबर आहेच. त्यामुळे तुम्ही जाऊन फॉर्म भरला. तरी देखील बातम्या लावल्या. अरे... राष्ट्रवादीच होती... शिवसेने शिंदे गट नव्हता... भाजप नव्हता... मी जर त्यांना बोलावलेलंच नव्हतं, जर एक घटना घडलेली असताना, ते दुःखात असताना, आपण चला-चला फॉर्म भरायला चला, असे म्हणणे मला योग्य वाटले नाही आणि निवडणूकही बिनविरोध होणार होती. कारण एकीकडे २०० मते होती आणि एकीकडे काही ७०-७५ मते होती. त्यामुळे आम्ही आपले गेलो."

"त्यावेळी, आमचे प्रमुख नेते फॉर्म भरताना प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि नरहरी झिरवाळ होते. कारण चार जणांनाच आत प्रवेश असतो. आता स्क्रुटिनीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे. आता माघार घेण्याची वेळ आहे. त्यावेळेत जर उमेदवाराने माघार घेतली नाही, तर त्या बिनविरोध आल्या असे समजायला हरकत नाही," असेही अजित पवार म्हणाले.

छगन भुजबळ यांच्यासंदर्भात काय म्हणाले अजित दादा - 
छगन भुजबळ यांच्यासंदर्भात बोलताना अजित दादा म्हणाले, "भुजबळ नाराज आहेत, हे धादांत खोटं आहे. स्वतःभुजबळांनी सांगितलं की, मी नाराज नाही. प्रफुल्ल भाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं, तरी देखील काही लोक, मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फारच जवळचे मित्र असतील, जे आमचा फारच विचार करतात. त्यांनी अशा बातम्या पिकवल्या आहेत. त्या बातम्यांमध्ये तसूभरही तथ्य नाही. यासंदर्भातला (सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज) निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने घेतला आहे आणि काल फॉर्म भरला." 


 

 

Web Title: While filling the form of Sunetra Pawar; Why not Eknat Shinde devendra Fadnavis Ajit Dada clearly said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.