विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण : पुणे-औरंगाबाद-जळगाव 'लिंक' असल्याचा व्यक्त केला संशय
विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी विद्यापीठाच्या होत असलेल्या बदनामीमुळे विद्यापीठ प्रशासन हैराण झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी कुलगुरूंची भेट नाकारली. त्यामुळे पाच दिवस घडलेल्या घडामोडींबाबत नि:शब्द असलेले कुलगुरू प्रथमच रविवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सामोरे गेले. तेविद्यापीठाची भूमिका मांडण्यासाठी. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी वादळी चर्चा झाली. या बैठकीत रविवारी पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही कुलगुरूंनी ही पत्रकार परिषद बोलावली होती.पत्रकार व कुलगुरू यांच्यात झालेला संवाद प्रश्नोत्तर स्वरूपात असा.. प्रश्न- एक परदेशी विद्यार्थिनी अनेक दिवस विद्यापीठात वास्तव्य करते,त्यानंतर तिचा परदेशी मित्रही अनधिकृतरीत्या शिक्षक भवनात राहतो, याची विद्यापीठ प्रशासनाला खबरही लागली नाही काय ? याची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाची? कुलगुरू- त्या-त्या विभागाची त्या-त्या ठिकाणी जबाबदारी असते. कोणाच्या हातून चूक झाल्यास प्रशासनाने स्वत:हून कार्यवाही केली आहे. परदेशी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात परदेश विभाग स्थापन केलेला आहे. त्यामार्फत परदेशी विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रक्रिया पार पडते. या सर्व प्रकरणाबाबत पोलीस तपास करीत आहे. तसेच सत्यशोधन समितीही चौकशी करणार आहे.प्रश्न- दोन महिन्यांपासून विद्यार्थिनीवरील अत्याचाराचा प्रकार सुरू होता.एवढे दिवस विद्यापीठ काय करीत होते?कुलगुरू- वसतिगृहातील पाच विद्यार्थिनींनी १ ऑक्टोबर रोजी माझी भेट घेऊन अला अब्दुल हा परदेशी विद्यार्थी वारंवार मानसिक त्रास देत असल्याची तोंडी तक्रार केली होती. त्या वेळी त्यांच्याशी चर्चा करून लेखी तक्रार देण्यास सांगितले.त्यानंतर या पाच विद्यार्थिनींनी दिलेल्या लेखी तक्रारीत अला अब्दुल हा वारंवार फोन करून मानसिक त्रास देतो. घरच्या व्यक्तींबद्दल माहिती विचारतो. परवीन या वसतिगृहात राहणार्या विद्यार्थिनीच्या सहकार्याने तो त्रास देत असल्याचे म्हटले होते. या वेळी या विद्यार्थिनींचे पालकही सोबत आले होते. त्यांच्या समक्ष पाळधी पोलिसांना फोन लावून त्या परवीनला ताब्यात दिले.प्रश्न- परवीनचा विद्यापीठाशी संबंध नसताना शिक्षक भवनात प्रवेश देण्याचा हेतू काय?कुलगुरू- परवीन या विद्यार्थिनीला शिक्षक भवनात अल्पावधीसाठी राहण्याची परवानगी देताना परदेशातील विद्यार्थ्यांची संख्या या विद्यापीठात अधिक वाढावी हा प्रामाणिक हेतू होता.प्रश्न- परवीनला प्रवेश देताना सगळी कागदपत्रे तपासली होती काय?कुलगुरू- त्या विद्यार्थिनीची कागदपत्रे पोलीस घेऊन गेले असून ते सील झाले आहेत. त्यासंदर्भात अधिक तपास पोलीस करीत आहेत. हे प्रकरण सत्यशोधन समितीकडे चौकशीसाठी देण्यात आले आहे. दोन्ही चौकशीतून सत्य बाहेर येईल.जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर पाच दिवसांपासून 'बॅकफूट'वर असलेल्या कुलगुरूंनी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदाच 'फ्रंटफूट'वर येण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार, परदेशी विद्यार्थिनीला शिक्षक भवनात दिलेला प्रवेश, कर्मचार्याची आत्महत्या या घडामोडींबाबत कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. पत्रकारांच्या प्रश्नांची ठोस उत्तरे आणि त्यासाठी पूरक पुरावे नसल्याने ते हतबल झाले होते. पोलीस चौकशी करीत आहेत. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेली सत्यशोधन समिती सर्व प्रश्नांची उकल करेल, एवढेच ते वारंवार सांगत होते. या प्रकरणात पुणे, औरंगाबाद ते जळगाव अशी परदेशी विद्यार्थ्यांची मोठी 'लिंक' असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.