पुणे : नववीत नापास होण्याची शक्यता असणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करवून घेऊन शाळांनी नववीचा निकाल १०० टक्के लावावा. तसे न केल्यास शासनातर्फे अनुदान आणि वेतनवाढ थांबविण्याची कारवाई करण्यात येईल, या स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता पहिली ते आठवीबरोबरच नववीतही पास होणे सोपे होणार आहे.दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी बहुतांश शाळा नववीतील अनेक मुलांना जाणून बुजून नापास करत असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात होते. आता, अभ्यासक्रमात मागे राहिलेल्या नववीतील मुलांची तयारी करवून घेऊन त्यांना दहावीत प्रवेश देण्याची जबाबदारी शासनाने मुख्याध्यापक-शिक्षकांवर सोपविली आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली, राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक व प्रमुख शिक्षण अधिकारी यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्या वेळी हे धोरण ठरविण्यात आले़सद्यपरिस्थितीमध्ये मुला-मुलींचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण २० टक्के असून ते प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उद्दिष्ट आहे. त्या अंतर्गत शासनाने ही योजना आखण्याचे ठरवले आहे. विभागीय शिक्षण संचालक रामचंद्र जाधव म्हणाले, दहावीच्या मूल्यमापन पद्धतीप्रमाणेच नववीच्या विद्यार्थ्यांचेही मूल्यमापन केले जाणार आहे. शिक्षणाधिकारी नववीच्या निकालांचीही पडताळणी करतील, असे बैठकीत ठरले आहे.
...तर अनुदान आणि वेतनवाढ थांबणार
By admin | Published: December 23, 2015 2:00 AM