मुंबई – शिवसेनेत असताना राज ठाकरेंवर अन्याय झाला, उद्धव ठाकरेंपेक्षाराज ठाकरेंना अध्यक्षपद मिळायला हवं होतं असं विधान शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे. कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यात पुन्हा एकदा रामदास कदमांनी शिवसेनेतील ठाकरे बंधू वादावर भाष्य केले आहे.
रामदास कदम म्हणाले की, निश्चितपणे राज ठाकरे यांच्यावर १०० टक्के अन्याय झालाय. उद्धव ठाकरेंना जेव्हा अध्यक्ष केले तेव्हा राज ठाकरेंना अध्यक्ष केले असते तर निश्चित महाराष्ट्रातील मराठी माणसांना न्याय मिळाला असता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची छबी म्हणून राज ठाकरेंकडे पाहिले जाते. त्यांचे वकृत्व, कतृत्व, त्यांचे बोलणे, चालणे हे सगळे बाळासाहेबांशी जुळते आहे. दुर्देवाने हे घडायला नको होतं, पण ते झाले. उद्धव ठाकरेंच्या आधी राज यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. उद्धव ठाकरे कितीतरी नंतर आले होते असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत राज ठाकरेंचे कुठे चुकते यावरही रामदास कदमांनी थेट भाष्य केले, ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत, शेवटच्या माणसांपर्यंत पोहचत नाहीत. मुंबई शक्यतो सोडत नाही. त्यांनी मुंबईच्या बाहेर पडले पाहिजे. गावागावात, वाडीवाडीत, जिल्ह्यात गेले पाहिजे. सुखदुखात लोकांच्या सहभागी झाले पाहिजेत. निश्चितपणे त्यांना भवितव्य आहे. आम्ही एकत्र काम केले आहे. मी राज ठाकरेंच्या अतिशय जवळ होतो, म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्यावर संधी मिळाली तेव्हा अन्याय केला, जे जे राज ठाकरेंसोबत होते त्यांना उद्धव ठाकरेंनी लांब केले. केवळ शिवसेनाप्रमुखांचा मला आशीर्वाद होता असंही रामदास कदम यांनी म्हटलं.
तसेच कुणी उठून मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असं बोलून कोणी होतं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी करून ते काँग्रेससोबत गेले. उद्धव ठाकरेंचा वाईट स्वभाव आहे. राज ठाकरेंच्या घरी कोण कोण आहे हे पाहण्यासाठी माणूस पाठवायचे. त्यानंतर तो रिपोर्ट आल्यानंतर त्या त्या माणसांची खाट पाडायचे असा आरोपही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला.