धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच केला उलट सवाल; म्हणाले, "साडेबारा कोटी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 04:29 PM2024-09-04T16:29:29+5:302024-09-04T16:33:05+5:30
कोल्हापुरात शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उलट सवाल केला आहे.
Dhananjay Munde on Sharad Pawar : विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली होती. महायुती सरकारच्या धोरणावर टीका करताना राज्यातील हे सरकार घालवायला पाहिजे, असे म्हणत शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. योजनांचा थेट लाभ देणारे हे सरकार तुम्हाला घालवायचे आहे का थेट सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मंगळावारी कोल्हापुरात कागल येथे भाजप नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लक्ष केलं. शरद पवारांनी भाषण करताना अजित पवार गटासह महायुती सरकारवरही जोरदार निशाणा साधला. "संकटकाळी साथ देण्याची जबाबदारी असताना लाचार होऊन दुसऱ्यांच्या दारात जाऊन बसलेल्या या नेत्याला जागा दाखवा. शेतकरी हिताची जपणूक करण्याची जबाबदारी केंद्राची असताना त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम हे सरकार करत आहे. केंद्र सरकारचे शेतकरी, कष्टकरी, तरुणांना उद्ध्वस्त करणारे धोरण आहे. राज्यात भगिनींचा सन्मान नव्हे तर अत्याचार सुरू आहे. त्यामुळे अशा नेत्यांच्या हातात सत्ता देऊ नका, राज्यातील हे सरकार घालवायला पाहिजे," असं शरद पवार यांनी म्हटलं.
शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार पलटवार केला. धनंजय मुंडे सध्या मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केलं. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देण्याचं काम हे सरकार करत आहे, मग हे योजनांचा थेट लाभ देणारे सरकार घालवायचे आहे का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.
"सरकार राज्यातील साडेबारा कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देत आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, किंवा शेतकऱ्यांचा पिक विमा असेल, शेतकऱ्यांना दरमहा नमो शेतकरी योजना असेल, तसेच वेगवेगळ्या घटकांसाठी राज्य सरकार प्रत्यक्ष लाभाच्या योजना राबवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहे. अशा चांगल्या योजना राबवणाऱ्या सरकारला का घालवायचे आहे," असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुतीचीच आहे, मात्र जेव्हा महायुतीतील घटक पक्ष पक्षाचा प्रचार करतात तेव्हा पक्षाच्या चौकटीत बसून योजनेबद्दल प्रचार केला जातोय. याबद्दल दुसरं कुठलंही मत काढण्याचे आवश्यकता नाही," असेही धनंजय मुंडेंनी म्हटलं.