मुंबई - शिवसेना उबाठा गटाची मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी संवाद यात्रा सुरू असून ही यात्रा भिवंडी लोकसभा मतदारसंघात पोहचली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर निशाणा साधला. सुषमा अंधारे यांचे भाषण सुरू होते त्यावेळी अचानक एका वानराची एन्ट्री झाली. या वानराच्या करामती मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
या सभेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, तपास यंत्रणाचा गैरवापर करून देशाची लोकशाही धोक्यात आणणाऱ्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत. निवडणूक लागली नाही, आचारसंहिता लागली नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही मतदारसंघात मी निवडणुकीला उभी नाही तरीही मी इथे आहे. कारण जर मी ठामपणे सांगते, कायदा माझ्या बापाने लिहिलाय, तर तो कायदा वाचवण्याची जबाबदारी माझी आहे. जे संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करतायेत त्यांच्याविरोधात मी उभी आहे. तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. पण यावेळी कमळावर ठपका मारला तर २०२९ ला ठपका मारण्यासाठी निवडणूक असेल हे विसरून जा. इतक्या गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरू आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आला नाही, बाळासाहेब नव्हते म्हणून उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळण्यात अडचण आली असं काही बदमाश सांगतात हे बोलताना मागे उभे असणारा वानर थेट सुषमा अंधारे यांच्यासमोर येऊन बसला. तरीही अंधारे यांनी भाषण सुरू ठेवले. जनतेने हे नीट समजून घ्यावे, जे म्हणतात, बाळासाहेब नव्हते म्हणून ही घटना घडली हे वाक्य म्हटलं, पण वानरामुळे सभेत काही काळ गोंधळ उडाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आणून दिली केळी अंधारे यांनी व्यासपीठाखाली फेकली. मात्र तरीही वानराने अंधारेंच्या दिशेने उडी मारली. तेव्हा सुषमा अंधारे स्वत:ला वाचवलं त्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
दरम्यान, बाळासाहेब हयात नाही म्हणून तुम्ही पक्ष ताब्यात घेतला असं काहींचे म्हणणं असेल मग शरद पवार हयात असताना शरद पवारांचा पक्ष कसा काय गेला? जो पक्ष शरद पवारांनी घडवला, वाढवला त्यांचाही पक्ष भाजपा ताब्यात घेते. समान प्रक्रिया वापरली जाते. या सर्व गोष्टीवरून एकच स्पष्ट होते की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेता नाही. व्हिजन नसलेले नेते फडणवीसांकडे आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडेंचे राजकारण ज्यांनी संपवले ते बावनकुळेंचे राजकारण संपवायलाही मागे पुढे बघणार नाही. कारण त्यांच्याही लक्षात आलंय फडणवीस यांनी फक्त महाराष्ट्राचे नाही भाजपाचेही नुकसान केले आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.