डोंबिवली: कुणालाही विचारलं काळ्या रंगाचा पक्षी कोणता तर आपण सहज कावळा असं सांगू. पण तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिला आहेत का? हो, पांढऱ्या रंगाचा कावळा. असाच एक पांढऱ्या रंगाचा कावळा मंगळवारी दुपारी पूर्वेकडील पेंडसे नगर परिसरात वावरताना प्लांट अँड अनिमल वेलफेअर सोसायटी (पॉज) संस्थेला आलेल्या हेल्पलाईन वर समजले असून पक्षीमित्र तो कुठे असेल यावर निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळी गेले, आणि त्यांनी कावळ्याला अन्य कावळ्यांच्या मारापासून वाचवलं.
याबाबत पॉजचे संचालक निलेश भणगे म्हणाले की, पेंडसे नगर मध्ये महेश वीला, आंध्र बँक जवळ पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता तेव्हा हितेश शहा ह्यांना तो कावळा आढळून आला. त्यांनी पॉज हेल्पलाईन ला फोन केला आणि निलेशने लगेच जाऊन त्याला बाकी काळ्या कावळ्याच्या मारातून वाचवलं. शहा यांच्या घराजवळ येणाऱ्या पाखरांमध्ये एक वेगळाच पक्षी असल्याचे आढळले.
कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केलं, तेव्हा त्या पक्ष्याची ठेवण चोच आणि डोळे हे कावळ्या सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली. त्यांनी त्या कावळ्याला वाचवलं असून मुरबाड येथील त्यांच्या संस्थेच्या हॉस्पिटलला निगराणी खाली ठेवले असल्याचे सांगितले.
अशा प्रकारचा कावळा क्वचितच आढळतो. खरंतर, पांढरा कावळा ही कोणतीही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे. पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. ही रंगद्रव्ये मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनसया प्रकारची असतात. या तीनही रंगद्रव्यांची कमी - जास्त किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते, असे भणगे यांनी सांगितले.