Eknath Khadse News : एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत? या प्रश्नाचे अखेर उत्तर मिळाले आहे. आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, पक्षाचे काम सुरू करणार आहे, असे खडसेंनी स्पष्ट केले. यावेळी भाजपमध्ये प्रवेश होऊनही घोषणा न होण्याचे कारण सांगताना खडसेंनी महाराष्ट्रातील भाजपच्या दोन नेत्यांची नावे घेतली.
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसेंनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली. खडसे म्हणाले, "भाजपमध्ये प्रवेश करावा, अशा सूचना मला वरिष्ठांकडून आल्या होत्या. मग मी त्यांना सांगितले की, मला थोडा वेळ द्या. तर त्यांनी सांगितले की, वेळ कशाला हवा. आताच प्रवेश करून घ्या. दिल्लीला मी होतो. विनोद तावडे, रक्षा खडसे आणि मी नड्डाजींना भेटलो. नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर घालून तुमचा प्रवेश झाला, असे मला सांगितले. त्या प्रवेशाला राज्यातील काही नेत्यांकडून विरोध झाला. त्यामुळे मला वाटते की माझा प्रवेश थांबला."
भाजपला बळकट करण्यासाठी प्रवेश करून घेतला -खडसे
"लोकसभेची निवडणूक लागली होती. लोकसभेला भाजपचे ९ खासदार निवडून आले. त्यामुळे भाजपची परिस्थिती नाजूक आहे, असे त्या काळात सर्व्हेतही दिसत होते. तशा बातम्याही येत होत्या. भाजपला बळकटी मिळावी, या हेतूने वरिष्ठांकडून मला भाजप प्रवेशाची सूचना केली असावी", असे खडसे म्हणाले.
"ज्यावेळी रक्षा खडसे उभ्या राहिल्या, तेव्हा भाजपला तुम्ही मदत करा म्हटले. मी रक्षा खडसेंना मदत केली. त्या निवडून आल्या. भाजपचा उमेदवार निवडून येईपर्यंत नाथाभाऊ चांगला. निवडून आल्यानंतर प्रवेशाला विरोध केला. आम्ही साथ देणार नाही, असे म्हटले गेले", असे टीकास्त्र खडसे यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांवर डागले.
विरोध करणारे दोन नेते कोण? खडसे म्हणाले...
"सगळ्यांना माहिती आहे की, विरोध होण्याची शक्यता देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन या दोघांकडून होऊ शकते. या दोघांचे स्पष्ट नाव घेतो, कारण गिरीश महाजनांनी प्रत्येक वेळी यावर उत्तर दिले आहे. मला हा संभ्रम आहे की, राज्यातील नेते मोठे आहेत की, नड्डाजी. मला त्या खोलात जायचे नाही. भाजप हा विषय मी सोडून दिला आहे", असे खडसे यांनी सांगितले.