शरद पवार वि. अजित पवार असा उभा संघर्ष जेव्हा राष्ट्रवादीत सुरु झाला, तेव्हा आमदारांसह खासदारांना कोणासोबत जायचे, कोणासोबत नाही असा संभ्रम पडला होता. याच अजित पवारांनी आधीच तयारी करण्यास सुरुवात केली होती. यामुळे काही आमदारांनी व खासदारांनी अजितदादांना प्रतित्रापत्रे देऊन टाकली होती. नंतर प्रकार लक्षात येताच या लोकांनी धावाधाव करत दुसरा गट गाठला आणि त्यांनाही प्रतिज्ञापत्रे दिली.
अशाप्रकारे दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्रे देणारे एक खासदार आणि पाच आमदार असल्याचे समोर आले आहे. यात एक खासदार अमोल कोल्हे यांनी आधीच याची माहिती दिली होती. अजित पवारांसोबत त्यांच्या निवासस्थानी असताना अमोल कोल्हेंनी प्रतिज्ञापत्र दिले होते. नंतर उपरती झाल्याने त्यांनी शरद पवार गट गाठला होता. या खासदार आमदारांना अजित पवारांनी राष्ट्रवादी हातात येताच कुठे जायचे ते ठरवावे असा इशारा दिला आहे.
अमोल कोल्हेंचे सर्वांनाच माहिती होते, परंतु ते पाच आमदार कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात, कार्यकर्त्यांत रंगली होती. ही नावेही समोर आली आहेत. या आमदारांमध्ये अशोक पवार, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक, चेतन तुपे, किरण लहानमठे यांचा समावेश आहे. यापैकी कोल्हे आणि पवार यांनी काऊंटर प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. यात शरद पवार यांच्या आदेशाने प्रतिज्ञापत्रे घेत असल्याची दिशाभूल अजित पवारांकडून करण्यात आली व प्रतिज्ञापत्रे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इतर आमदारांनी द्विधा मनस्थितीत प्रतिज्ञापत्रे दिली आहेत. आता या आमदार खासदारांना आपला पक्ष निवडावा लागणार आहे. कारण आता व्हीप, शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्याचे राजकारण घडणार आहे.