कोल्हापूर : शिवसेनेकडून ‘मीच शहाणा’ म्हणत सातत्याने केले जात असलेले आरोप आता अति झालेत. आमच्या सहनशीलतेचा स्फोट झाला आहे. मला पालकमंत्रिपदावरून हटवा म्हणणाऱ्या नीलम गोऱ्हे कोण, असा संतप्त सवाल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. गोऱ्हेंनी आपली काळजी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर महापालिका निवडणुकीदरम्यान सोमवारी झालेल्या हाणामारीतील दोषींवर पोलीस निष्पक्षपातीपणे कारवाई करतील. हाणामारीचा ‘इश्यू’ करून भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या नेत्या गोऱ्हे यांनी वृत्तवाहिन्यांकडे जाऊन भाजपवर व माझ्यावर टीका करण्याची गरज नव्हती. अलीकडे शिवसेनेकडून भाजपचा अपमान करण्याचे प्रमाण वाढले आहे. दुय्यम वागणूक दिली जात आहे, टीका सहन करतो याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत, असा होत नाही. आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे सेनेच्या विरोधात मीही जाहीरपणे बोलत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार दृृष्टिक्षेपात आहे. शिवसेनेकडून मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी गोऱ्हे आमच्यावर टीका करत आहेत. निवडणुकीतील कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी माझ्याशी थेट संपर्क साधून बोलण्याचा हक्क गोऱ्हेंना आहे, असे असताना पत्रकार परिषद घेऊन मला पदावरून हटवा, असे सांगणे चुकीचे आहे. त्यापेक्षा त्यांनी त्यांच्या दोन महिन्याने संपणाऱ्या आमदारकीची काळजी करावी. मुख्यमंत्र्यांकडून दादांनाच बळ...पालकमंत्री पाटील यांच्यावर दोन्ही काँग्रेससह शिवसेनेकडून जोरदार हल्ला सुरू असल्यानेच सायंकाळी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दादांची जोरदार पाठराखण केली. दादा हे वर्षभरात अंगाला डाग लागू न शकलेले प्रामाणिक मंत्री असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले. दादांचा उल्लेख त्यांनी ‘कार्यक्षम, अतिशय सक्षम मंत्री’ असा केला व सभेत शिवसेनेची मात्र त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही.
राजीनामा मागणाऱ्या गोऱ्हे कोण?
By admin | Published: October 28, 2015 12:13 AM