मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करा, अशी गळ घालण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांना भेटायला गेले होते, असा दावा विरोधक करत आहेत. या वृत्तामुळे शरद पवार एनसीपी आणि काँग्रेसमधूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. अशातच तीन दिवसांच्या दिल्ली मुक्कामी असताना ठाकरेंना भेटण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची बडी असामी आल्याचा दावा शिंदे गटाच्या खासदारांनी केला आहे.
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी हा दावा केला आहे. मलाच मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. परंतू काँग्रेसने त्यांना हुसकावून लावल्याची टीका म्हस्के यांनी केली आहे. दिल्लीत त्यांना कुणी भाव दिला नाही. हा घालीन लोटांगण दौरा अराजकीय होता, असे संजय राऊत कालच म्हणाले आहेत. तीन दिवसांत ठाकरे कुटुंब राऊतांच्या घरातच तळ ठोकून होते. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण आला होता, असा खळबळजनक दावा म्हस्के यांनी केला आहे.
ठाकरे आणि गुप्ता यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे. राऊतांनी घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचीत बंद ठेवले असतील. पण या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत. राऊतांच्या बंगल्यात ७ तारखेला संघ्याकाळी काळ्या काचेच्या गाडीतून कोण आले होते याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी म्हस्के यांनी केली.
वादग्रस्त गुप्ता बंधूना उद्धव ठाकरे नक्की कशासाठी भेटले याचीही चौकशी व्हायला हवी. उद्धव ठाकरे यांना राजकारणातलं फार काही कळत नाही, असे शरद पवारांनी लिहून ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्यालाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यात उध्दव ठाकरे अडसर ठरू नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच गुप्ता बंधूंची भेट घडवून आणलेली नाही ना असा संशय घ्यायलाही जागा आहे, असे म्हस्के म्हणाले.
एकट्या उद्धव ठाकरेंनाच नव्हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अडकवण्याचा राऊतांचा प्लॅन नाही ना? सत्ता गेल्यामुळे ठाकरेंकडे कंटेनर येणे बंद झाले आहे. आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना, त्याची सखोल चौकशी व्हायला हवी ही आमची मागणी आहे, असे म्हस्के यांनी म्हटले.