मुंबई - महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची युती निश्चित समजली जात आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री कुणाचा असणार यावरुन भाजप-शिवसेनेत वाद सुरु आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचा पंतप्रधान पदाचा उमदेवार कोण ? यावरून आघाडीतील पक्षांवर मोठ्याप्रमाणात टीका करणाऱ्या भाजप व शिवसेनेला आता विधानसभा निवडणुकीत युतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमदेवार कोण ? हे सांगणे अशक्य झाले आहेत.
आगामी विधानसभा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती असणार आहेत. मात्र असे असताना ही पुढील मुख्यमंत्री कुणाचा यावरून युतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. लोकसभा निवडणुकीत,पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, असे म्हणणारे युतीचे नेते आता मुख्यमंत्री पदाचा उमदेवार कोण हे सांगण्याचे धाडस दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आता भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे. तर तिकडे पुढच्या शिवसेनेच्या मेळाव्यात सेनेचा मुख्यमंत्री असणार असल्याचा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आले होते. त्यामुळे, युतीत गैरसमज निर्माण होतील असं कोणतंही वक्तव्य करू नका. माध्यमांपासून दूर राहा, अशी समज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेच्या आमदार व मंत्र्यांना दिली होती. .
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी कान टोचल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते यावर आता बोलायला टाळत आहे. तर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा यावर उघडपणे भाष्य करायाल तयार नाहीत. त्यामुळे लोकसभेत ज्याप्रमाणे विरोधक म्हणत होते पंतप्रधान महाआघाडीचाच होणार, पण नाव नाही सांगणार. त्याचप्रमाणे आता, युतीचाच मुख्यमंत्री होणार म्हणणारे सत्ताधारी नाव सांगायला तयार नाहीत.
लोकसभा निवडणुकीत देशातील भाजप विरोधातील सर्व पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करत सत्ताधारी विरोधात रिंगणात उतरले होते. कोलकातामध्ये झालेल्या विरोधकांच्या पहिल्याच रॅलीमध्ये २० पेक्षा अधिक पक्ष सहभागी झाले होते. मात्र शेवटपर्यंत महाआघाडीचा पंतप्रधानपदाचा उमदेवार कोण असणार हे त्यांना सांगता आले नाही. तशीच काही परिस्थिती आता भाजप-सेनेची झाली आहे. ज्याप्रमाणे महाआघाडीत एखांद्याचे नाव पुढे केल्यानंतर आघाडीत बिघाडीची होण्याची भीती होती. त्याचप्रमाणे इच्छा असून ही भाजप-शिवसेनेला मुख्यमंत्रीपदावर उघडपणे दावेदारी करता येत नाही हे विशेष.