ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ - जगातील सर्वोच्च 'माऊंट एव्हरेस्ट शिखर' सर केल्याचा दावा करणा-या पुण्यातील पोलीस दांपत्य दिनेश व तारकेश्वरी राठोड या दोघांनाही पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र या दांपत्याची खात्यांतर्गत चौकशी सुरुच राहणार आहे. यापूर्वी नेपाळ सरकारने त्यांच्यावर १० वर्षांची बंदी घातली होती. राठोड दांपत्याने एव्हरेस्ट शिखर केल्याचा खोटा दावा केला असून खोटी माहिती दिल्याचे सांगत नेपाळ सरकारने त्यांच्याविरोधात ही कारवाई केली होती.
शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात दिनेश टी. राठोड (३०) व तारकेश्वरी भालेराव -राठोड (३०) हे कार्यरत होते. २००६ साली ते शहर पोलिस दलात रूजू झाले. तारकेश्वरी या राष्ट्रीय फुटबॉलपटू असून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटेपटू आहेत. तर दिनेश हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे व किकबॉक्सिंगपटू आहेत. या दोघांचा २००८ साली प्रेमविवाह झाला. आपल्या एव्हरेस्टच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. दुस-या प्रयत्नात जून महिन्यात आपण हे शिखर सर केल्याचा दावा त्यांनी केला होता, तसेच एव्हरेस्टवरील काही फोटोही शेअर केले.
मात्र त्यांचा हा दावा खोटा असून त्यांनी एव्हरेस्टवर कोणतीही चढाई केलेली नव्हती. तसेच पुण्यातील एका फोटोग्राफरकडून त्यांनी मॉर्फ केलेले (नकली) फोटो सादर केल्याचे उघड झाले होते. एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल सादर करण्यात आलेली कागदपत्रेही खरी नसून ती बनावट असल्याचे समोर आले असून नेपाळ सरकारने त्यांचे पितळ उघडे पाडत त्यांच्यावर बंदी घातली. हा प्रकार पोलिस दल व देशाची इमेज बिघडवणारा असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्लांनी म्हटले होते. या कारस्थाप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही शुक्लांनी दिले होते. पुणे पोलिसांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे या दोघांवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरुच राहणार आहे.