मुंबई - भारतीय जनता पक्षाचा झंझावात आणि विरोधकांची झालेली वाताहत यामुळे अनेकांना विधानसभेत निवडून येण्याची भ्रांत आहे. ज्यांना निवडून येण्याची खात्री आहे, त्यांना मंत्रीपदाची ओढ आहे. तर काही नेत्यांना निर्माण केलेले साम्राज्य टिकून ठेवायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांचा पक्षांतरावर जोर वाढला आहे. मात्र या पक्षांतरातून भाजप आणि शिवसेना यांच्यातील गटबाजी वाढण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ३० हून अधिक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेत या आयारामांना मोठ्या आदराने सामावून घेतले गेले आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून पक्षाकडून संधी मिळेल या आशेवर अनेक कार्यकर्ते आहेत. अशा वेळी बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी दिल्यास, गटबाजी होण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही जागांवर भाजपने उमेदवार बदलले. त्यावेळी भाजपने नाराज नेत्यांची समजूत काढली तर अनेकांची बंडखोरी मोडीत काढली. विधानसभा पातळीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे. त्यामुळे बंडखोरीही मोठ्या प्रमाणात होणार आहे. कदाचित ही बंडखोरी मोडीत काढण्यात भाजपला यशही येईल. परंतु, पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान वाटते तेवढे सोपे नाही.
पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या विजयासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना धडपड करावी लागणार आहे. निवडून आल्यानंतर या आयारामांचे मतदार संघात वर्चस्व वाढणार आहे. त्यामुळे या आयारामांना निवडून का आणायच, असा काहीसा प्रश्न कार्यकर्त्यांना पडू शकतो. हे रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी गटबाजी केल्यास, त्याचा फटका सहाजिकच पक्षाला बसणार आहे. त्यामुळे आयारामांची आणि पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची घडी भाजपला बसवावी लागणार आहे. अन्यथा आवक वाढीचा परिणाम गटबाजी वधारण्यावर होणार हे नक्की.