सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 05:49 PM2024-08-15T17:49:45+5:302024-08-15T17:50:24+5:30
माझ्या त्या विधानाचा जास्त कुणी विचार करू नका. कौटुंबिक दृष्टीने मी ते विधान केले होते असं अजित पवारांनी सांगितले.
मुंबई - पत्नी सुनेत्रा पवार हिला बारामतीतून उभं करायला नव्हतं पाहिजे. निकालानंतर मी विचार केला ते कुटुंबाच्या दृष्टीने चुकीचे होते असं सांगत आमच्या संसदीय समितीने सुनेत्रा पवारला तिकीट देण्याचा निर्णय घेतला होता असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी हे भाष्य केले.
अजित पवार म्हणाले की, जे मनात असतं ते मी बोलून टाकतो हा माझा स्वभाव आहे. निवडणूक झाल्यानंतर मी विचार केला तेव्हा बारामतीत सुनेत्राला उभं करायला नको होतं. ते कुटुंबाच्यादृष्टीने चुकीचे होते असं मला वाटलं. कुटुंबात एकमेकांविरोधात उभं राहिले. जिंकणारा आणि हरणारा हा कुटुंबातलाच एक होता. माझा स्वभाव पक्षातील सर्वांनाच माहिती आहे. कुटुंबाबाबत बोलण्याचा अधिकार मला आहे. त्यामुळे कुणी नाराज होण्याचं कारण नाही. जर कुणाला हे विधान आवडलं नसेल तर त्याचा जास्त विचार करू नका. हे विधान कौटुंबिक आहे असं त्यांनी स्पष्ट केले.
त्याशिवाय निवडणुकीत उभं न राहणारे पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे यांच्यमागे १४५ आमदार होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी बहुमत गरजेचे असते. पृथ्वीराज चव्हाणांना तसे मुख्यमंत्रिपद मिळाले. हे दोघे पहिले मुख्यमंत्री झाले त्यानंतर आमदार बनले. विधानसभा, विधान परिषदेचा सदस्य नसतानाही मुख्यमंत्री बनू शकतात. १४५ आमदारांचे बहुमत मुख्यमंत्री व्हायला लागते. आम्ही महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढत आहोत. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळावं यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही कामाला लागलोय. प्रत्येकजण मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतोय. राज्यातील मतदार अंतिम निर्णय घेतील असं अजित पवारांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलं. आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत. सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या आहेत. मतदारसंघातील विकासाबाबत आम्ही लोकांना सांगतोय. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्याकडून ज्या कमी राहिली, मतदार दुरावले त्यांना पुन्हा आमच्यासोबत आणण्याचा प्रयत्न करतोय. लोकसभेत संविधान बदलणार, आरक्षण बदलणार असे नॅरेटिव्ह विरोधकांनी सेट केले. महाराष्ट्रात त्याचा मतदारांवर परिणाम झाला. विरोधकांच्या आरोपांवर आम्ही उत्तर देत होतो. अबकी बार ४०० पार हा नारा दिला गेला त्यामुळे लोकांच्या मनात विरोधकांनी शंका उपस्थित केली. आमच्यावर मतदारांनी विश्वास ठेवला नाही असं अजित पवारांनी सांगितले.
निवडणूक निकालानंतर घेतला आढावा
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी बसलो होतो. तिघांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालामागील पराभवाची कारणे याचा आढावा घेतला. त्यामुळे पुढील रणनीतीसाठी आम्ही काही गोष्टी ठरवल्यात. निवडणूक निकालानंतर आम्ही आढावा घेतला, सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. आजपासून निवडणूक होईपर्यंत केवळ विकासावर बोलायचे. विरोधकांवर काही बोलायचे नाही. मी विकासाचं राजकारण करतोय. आत्ताच्या अर्थसंकल्पात आम्ही खूप चांगल्या योजना आणल्यात. यंदा १० व्यांदा मी बजेट सादर केला. ७ योजना आम्ही लोकांसाठी आणल्या आहेत असं अजित पवारांनी सांगितले.
स्थानिक निवडणुकीत महायुती?
आम्ही अडीच वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत राहिलो. कोरोनासारख्या कामात आम्ही लोकांसाठी जे जे काही शक्य होते ते केले. अडीच वर्ष सोबतच काम केले. एकनाथ शिंदेही मंत्रिमंडळात होते. तेदेखील कोरोना काळात काम करत होते. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा आम्ही दुसऱ्या फळीत काम करायचो. सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यांवर राष्ट्रवादीची स्थापना झाली. जूनमध्ये पक्ष स्थापन केला आणि ऑक्टोबरमध्ये काँग्रेससोबत जात सरकार बनवलं. १५ वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीनं सरकार चालवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढत होतो. आघाडी विधानसभा, लोकसभेत असायची. महापालिका, जिल्हा परिषदेत नसायची. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून युती, आघाडीचा निर्णय घेतला जातो. आम्ही संविधानाचा आदर कालही करत होतो, आजही करतो आणि उद्याही करणार आहोत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहोत असं अजित पवारांनी सांगितले.