मुंबई : नागपुरातील प्रस्तावित एअर बस प्रकल्प कुणामुळे गुजरातमध्ये गेला, यावर आता आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उठला आहे. गुजरातमध्ये एकामागून एक उद्योग पळविण्यासाठीच शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आणले गेले, असा आरोप माजी उद्योग मंत्री व शिवसेना (ठाकरे गट) नेते सुभाष देसाई यांनी केला. तर सप्टेंबर २०२१ मध्येच एअर बस प्रकल्पासाठीचा करार झाला होता, तेव्हा सरकार कोणाचे होते, असा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला.
देसाई म्हणाले, की आमचे सरकार असताना टाटांच्या नागपुरातील एअरबस प्रकल्पासाठी बैठका झाल्या होत्या. मनुष्यबळ, सवलती देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पुढे ‘वर्षा’ बंगल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्यासोबत एक बैठक झाली. यामध्ये सेमीकंडक्टर, एअरबस आणि इतर प्रकल्पांबाबतही चर्चा झाली होती. पुढील टप्प्यात सह्याद्री अतिथिगृहावर बैठक झाली. त्याला मी मी, मंत्री आदित्य ठाकरे, टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन उपस्थित होते. हा प्रकल्प नवीन सरकारने पुढे न्यायला हवा होता.
उदय सामंत म्हणतात...मी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसात मला टाटाच्या नागपुरातील या प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारले असता मी विविध प्रकल्पांचा आम्ही पाठपुरावा करू असे म्हटले होते. नंतर मी माहिती घेतली असता नागपुरातील प्रकल्प मविआ सरकारच्या काळातच गुजरातेत गेला असल्याचे मला समजले. तो परत मिळावा यासाठी मी पत्रव्यवहार केला.
असे काय घडले?मंत्री प्रकल्पाबाबत वेगवेगळी वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा लोकांची दिशाभूल करत आहेत. मेरीटवर प्रकल्प येत असताना असे काय घडले की तीनही प्रकल्प गेले, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी केला. पटोले यांचा सवालउद्योग, महत्त्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या आणि मुंबई-महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे हे आठ वर्षांपासून सुरू आहे. आता मुंबईही गुजरातला देतील. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
तेव्हा झोपा काढत होते का?प्रसाद लाड म्हणाले की या प्रकल्पासाठी २१ सप्टेंबर २०२१ रोजी एमओयू झाला याची माहिती तत्कालीन मविआ सरकारला होती का? केंद्र सरकार, टाटा आणि एका फ्रेंच कंपनीदरम्यान तो करार झाला तेव्हा मविआ सरकार झोपा काढत होते का? आताच्या सरकारच्या काळात नाही तर मविआ सरकारच्या काळातच प्रकल्प तिकडे गेला. आता आमच्यावर खापर का फोडत आहात?
राष्ट्रवादी करणार आंदोलनराज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राज्यभर सरकारविरोधात आंदोलन केले जाणार आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.