मुंबई - मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत ठिकठिकाणी फेरीवाल्यांना मारहाण करून दादागिरी करून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसही त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईतील आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व येथील फेरीवाल्यांची भेट घेतली. यावेळी संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे फेरीवाल्यांना धमकी देतात. त्यांचे फालतू कार्यकर्ते गरीब फेरीवाल्यांना मारहाण करून त्यांना हुसकावून लावतात. हे भ्याडपणाचे लक्षण आहे. पोलिसही त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करत नाहीत. नुसते अटक केल्याचे नाटक करतात. कोण अधिकृत आणि कोण अधिकृत फेरीवाले हे ठरवण्याचा अधिकार राज ठाकरे आणि आणि त्यांच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही. राजकारणामध्ये स्वतःची डाळ शिजत नाही. त्याचा राग ते गरीब फेरीवाल्यांवर काढत आहेत. काही ठिकाणी पोलीस सुद्धा मारून फेरीवाल्यांना जबरदस्तीने हुसकावून लावते. अशी सुद्धा तक्रार फेरीवाले करत आहेत. माझे मुंबईतील सर्व फेरीवाल्यांना सांगणे आहे की अशा फालतू लोकांना घाबरण्याची काहीही गरज नाही. काँग्रेस पक्ष सदैव तुमच्या पाठीशी आहे. फेरीवाला कायदा आपल्या देशात आहे. तो लागु करण्यात सरकार अपयशी ठरते हा सरकारचा दोष आहे. माझे मुंबईतील पोलिसांना सुद्धा सांगणे आहे की जर मनसेचे फालतू गुंड निरपराध फेरीवाल्यांना त्रास देत असतील त्यांच्यावर जुलूम करत असतील तर त्यांना संरक्षण देणे पोलिसांचे काम आहे. जर मनसेचे गुंड फेरीवाल्यांना असाच त्रास देत राहिले आणि पोलिसांनी मनसेच्या फालतू गुंडांवर त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर सर्व फेरीवाले कायदा हातात घेण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत. काँग्रेस पक्ष त्यांच्या बरोबर उतरून आंदोलन करेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत आझाद हॉकर्स युनियनचे जय सिंह आणि अनिस फातिमा शेख, काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
''कोण अनधिकृत फेरीवाले हे ठरविण्याचा अधिकार राज ठाकरे आणि मनसेच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 9:06 PM