संजय राऊत यांनी 'निर्लज्ज' म्हणून उल्लेख केलेले रामलाल नेमके होते कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 05:39 PM2020-04-19T17:39:34+5:302020-04-19T17:47:58+5:30

का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर हे रामलाल कोण? आणि त्यांनी नेमके काय केले होते असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. 

Who exactly was governor Ramlal? Why Sanjay Raut called him 'shameless'? BKP | संजय राऊत यांनी 'निर्लज्ज' म्हणून उल्लेख केलेले रामलाल नेमके होते कोण?

संजय राऊत यांनी 'निर्लज्ज' म्हणून उल्लेख केलेले रामलाल नेमके होते कोण?

Next
ठळक मुद्देरामलाल ठाकूर हे एकेकाळचे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते, ते काही काळ आंध्र प्रदेशचे राज्यपाल होतेया काळात रामाराव हे उपचारांसाठी परदेशात गेल्यावर रामलाल यांनी भास्करराव यांना परस्पर मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होतीत्यानंतर एन. टी. रामाराव यांनी राज्यपाल आणि काँग्रेसविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन सुरू केले होते

मुंबई - उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात यावे यासाठी त्यांच्या विधीमंडळ सदस्यत्व मिळवण्याच्या मार्गात सध्या अनेक अडथळे आणले जात आहेत. त्यावरून राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांच्यावरही  टीका केली जात आहे. या प्रकारांवरुन आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक जळजळीत ट्विट केले होते. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है' असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. दरम्यान, या ट्विटनंतर हे रामलाल कोण? आणि त्यांनी नेमके काय केले होते असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. 

तर रामलाल म्हणजेच रामलाल ठाकूर हे एकेकाळचे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. त्यांनी हिमाचल प्रदेशचे मुखमंत्रीपदही भूषवले होते. मात्र संजय राऊत यांनी त्यांचा निर्लज्ज उल्लेख हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी नव्हे तर 80च्या दशकात राज्यपाल म्हणून घेतलेल्या एका वादग्रस्त राजकीय  निर्णयामुळे केला आहे. 

रामलाल यांनी 1983-84 या काळात आंध्र प्रदेशचे राज्यपालपद सांभाळले होते. त्यादरम्यान आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एनटी रामाराव हे वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत गेले होते. तेव्हा रामलाल यांनी रामाराव यांच्याच मंत्रिमंडळातील वित्तमंत्री एन. भास्करराव यांना परस्पर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. या निर्णयाला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील होताच. दरम्यान, रामाराव हे उपचार आटोपून भारतात परतल्यावर त्यांना मुख्यमंत्री म्हणून मान्यता देण्यास रामलाल यांनी नकार दिला. 

त्यानंतर एन. टी. रामाराव यांनी राज्यपाल आणि काँग्रेसविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन सुरू केले होते. अखेरीस या आंदोलनाची झळ दिल्लीला पोहोचल्यावर महिनाभरानंतर राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांनी राज्यपाल रामलाल यांना पदावरून हटवले. त्यानंतर रामाराव यांचा पुन्हा एकदा शपथविधी झाला. दरम्यान, हा सर्व प्रकार भारतीय राजकारणातील एक काळा अध्याय म्हणून पहिला जातो.

Web Title: Who exactly was governor Ramlal? Why Sanjay Raut called him 'shameless'? BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.