ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून दोन महिने उलटून होत आले तरीही दत्तात्रय पडसलगीकर यांना हक्काचे घर मिळालेले नाही. मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडत असून पोलीस आयुक्त पडसलगीकर मात्र अद्यापही वरळी येथील पोलिसांच्या खानावळीतील एका खोलीत राहत असल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने
दिले आहे. पडसलगीकर
दिल्लीत दशकभराचा कालावधी घालवल्यानंतर मुंबई आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी पडसलगीकर १४ जानेवारी मुंबईत परतले आणि ३१ जानेवारी रोजी त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र त्यांच्यासाठी निवासस्थान उपलब्ध नसल्याने ते परत आल्यापासून पोलिसांसाठी असलेल्या खानावळीच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील एका खोलीत रहात असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मात्र ही खोली त्यांच्या आत्ताच्या पदाला साजेशी नाही.
खरतर मुंबई पोलीस आयुक्त हे दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयाच्या जवळपासच सरकारी निवासस्थानात राहतात. पडसलगीकरांच्या बाबतीत मात्र अपवदात्मक परिस्थिती असून त्यांना राहण्यायोग्य निवासस्थान त्यांना अद्याप देण्यात आलेले नाही.
'महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महापौर वा मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्य अधिकारी यांच्याप्रमाणे पोलीस आयुक्तांना एखादे कायमचे निवासस्थान मिळत नाही ही खरी गोष्ट आहे', असे एका आयपीएस अधिका-याने सांगितले. ' यापूर्वीही अनेक वरिष्ठ पोलीस अधिका-यांना पोलिसांसाठीच्या खानावळीत मुक्काम करावा लागला होता, मात्र खुद्द पोलीस आयुक्तांनाच तेथे राहवे लागल्याची ही पहिलीच घटना आहे' असेही त्याने नमूद केले.