मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी जवळपास ८ तास त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. तर राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना १० दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना ईडीच्या कार्यालयातील माहिती कशी मिळाली व ईडीच्या कार्यालयातील माहिती राजकीय नेत्यांना पोहचवण्याच काम कोण करतोय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज ठाकरे यांना ईडीची नोटीस येताच राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळाले होते. त्यांनतर ईडीकडून होणाऱ्या कारवाईमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला होता. एवढच नाही तर, ईडी भाजपच्या आदेशाने विरोधात बोलणाऱ्यांना नोटीस पाठवत असल्याचा आरोप सुद्धा विरोधकांनी केला होता. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडी कार्यलयाच राजकीय कनेक्शन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र आता आंबेडकर यांच्या दाव्यानंतर विरोधकांचा दावा खरा आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.
राज यांना नोटीस येणार आहे हे प्रकाश आंबेडकर यांना १० दिवसांपूर्वीच माहित होते. विशेष म्हणजे बाळा नांदगावकर यांनी सुद्धा मान्य केलं आहे की, त्यांना आंबेडकर यांनी ईडीची नोटीस येणार असल्याची कल्पना दिली होती. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीच्या कार्यालयातील माहिती राजकीय नेत्यांपर्यंत कोण पोहचवत आहे, असा प्रश्न उपस्थित आहे. तसेच खरच ईडीचे राजकीय संबध आहे का? अशीही चर्चा आता पाहायला मिळत आहे.