मुंबई : शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे यांच्यातील दुरावा संपुष्टात आणून परस्परांच्या तगडय़ा उमेदवारांविरुद्ध उमेदवार उभे न करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र त्यामध्ये मोडता घालण्याचे काम एका नेत्याच्या निकटवर्तीय व्यक्तीने केले. याचीच सध्या दोन्ही पक्षांतील सैनिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
शिवसेना-भाजपा युती संपुष्टात आल्यानंतर प्रादेशिक पक्षांना सत्तांधतेतून संपवण्याचे राजकारण करणा:या भाजपाला धडा शिकवण्याकरिता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असा सल्ला काही मराठी उद्योगपती, लेखक, पत्रकार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला. यापूर्वी या दोघांमध्ये समझोता करण्याकरिता धडपड करणारे भय्यू महाराज हेही सक्रिय होते. त्यांनी दोघांशी चर्चा करून जागावाटपात परस्परांच्या तगडय़ा उमेदवारांसमोर उमेदवार न टाकण्याचा पर्याय निघतो का ते तपासून पाहण्याची सूचना केली होतीच. त्यानुसार, शिवसेनेचे संजय राऊत, अनिल देसाई तर मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्या बैठका सुरू झाल्या. मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा थांबवली तर काही उमेदवारांना एबी फॉर्म देणो स्थगित केले.
मात्र दोन्ही पक्षांतील काही महत्त्वाकांक्षी व्यक्ती व ज्यांच्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये वितुष्ट आले, अशी काही घरचीच माणसे सक्रिय झाली. राज यांची अडचणीच्या वेळी मदत घेतली तर कायम ते त्याचा उल्लेख करून हिणवत राहतील. यापूर्वी बाळासाहेबांना दिलेले सूप व वडे काढून किंवा उद्धव यांची प्रकृती बरी नसताना केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी केला होता. शिवाय शिवसेनेला स्वबळावर ‘मिशन 150’ पूर्ण करता येणार नाही; त्यामुळे मनसेची मदत घेतल्याची टीका होईल, असा सूर घरातील काही मंडळींनी लावला. अखेरीस दोन भावांच्या मनोमिलनाची शक्यता दुरावली. (विशेष प्रतिनिधी)
असे आखले होते डावपेच
मनसेच्या 35 ते 40 तर शिवसेनेच्या 88 ते 95 जागांवर एकमेकांनी कमकुवत उमेदवार द्यायचे आणि दोन्ही पक्षांचे जास्तीतजास्त उमेदवार विजयी करायचे, असा पर्याय चर्चेतून पुढे आला. तशीच वेळ आली तर राष्ट्रवादीसारख्या प्रादेशिक पक्षाला सोबत घ्यायचे, परंतु काँग्रेस व भाजपा या दोघांना दूर ठेवायचे, असे आराखडे तयार झाले.