मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार, याविषयी तर्कविर्तक लढविले जात आहेत. शिंदे यांच्यासोबत आधीच्या सरकारमधील नऊ मंत्री आहेत. त्यांना पुन्हा मंत्रिपदे दिली जातील असे म्हटले जाते.
भाजपतर्फे कॅबिनेटचे संभाव्य उमेदवार माजी मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, राजेंद्र पाटणी, माधुरी मिसाळ, संभाजी पाटील - निलंगेकर. याशिवाय, कॅबिनेट मंत्रिपदासाठी डॉ. विजयकुमार गावित, किसन कथोरे, सुरेश खाडे, योगेश सागर, रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा विचारही केला जात असल्याचे सांगितले जाते.
यांना राज्यमंत्रिपद? राज्यमंत्री म्हणून राहुल आहेर, डॉ. तुषार राठोड, अतुल सावे, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, रणधीर सावरकर, देवयानी फरांदे यांच्या नावांचाही विचार केला जात आहे.
चार-पाच मंत्रिपदे रिक्त? - राज्य मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्यांची संख्या ४२ इतकी असते. त्यातील चार ते पाच मंत्रिपदे रिक्त ठेवली जावू शकतात. शिंदे यांच्या गटाला १४ ते १५ मंत्रिपदे दिली जातील असे आधी म्हटले जात होते. - त्यांच्या गटाच्या मंत्रिपदांची संख्या कमी केली जावू शकते. - मंत्रिपदासाठी विचार करताना जातीय समीकरणे, मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विभागीय संतुलनांचा विचार केला जाईल. - एकनाथ शिंदे गटातून विद्यमान मंत्र्यांव्यतिरिक्त आशिष जयस्वाल, बालाजी किणीकर यांना मंत्रिपदे दिली जावू शकतात.