इंदापूर मतदार संघातून कोण ? भरणे की, हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 11:26 AM2019-07-08T11:26:28+5:302019-07-08T11:29:00+5:30
२०१९ मध्ये राष्ट्रवादीने आघाडीतील ही जागा काँग्रेसला सोडल्यास भरणेंचा मतदार संघ कोणता असा प्रश्न उपस्थित होणार आहे. अशा स्थितीत भरणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई - लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीला जोर चढत आहे. युती, आघाडीच्या चर्चांना वेग आला आहे. त्याचवेळी अनेक मतदार संघातील पेच प्रमुख राजकीय पक्षांसमोर हळूहळू समोर येत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदार संघाचा देखील समावेश आहे. हर्षवर्धन पाटील यांचा गड मानला जाणाऱ्या इंदापूर मतदार संघात २०१४ मध्ये राष्ट्रीवादी काँग्रेसने बाजी मारत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी स्वबळावर निवडणुक लढविणारा राष्ट्रवादी पक्ष आता आघाडी करणार हे निश्चितच आहे. त्यामुळे २०१९ मध्ये हा मतदार काँग्रेसला कि, राष्ट्रवादीला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इंदापूर मतदार संघातून हर्षवर्धन पाटील सलग चार वेळा निवडून आले. परंतु, २०१४ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन यांना पराभूत केले. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रवादी काँग्रेस या मतदार संघावर दावा करणार हे निश्चितच. परंतु, या मतदार संघातील निवडणूक लोकसभा निवडणुकीला जोडली गेल्यामुळे हर्षवर्धन पाटील सध्या तरी निश्चित असल्याचं दिसतं.
लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे आभार देखील मानले होते. सुळे यांना लोकसभा निवडणुकीत केलेली मदत हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, किंबहुना तसा तह झाल्याची शक्यता व्यक्त आहे. परंतु, विधानसभेच्या जागा वाटपानंतरच इंदापूर मतदार संघातून कोण, हे चित्र स्पष्ट होणार आहे.
भरणेंच्या भूमिकेवर लक्ष्य
दत्तात्रय भरणे यांनी २०१४ विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला मोडकळीस आणला. यावेळी त्यांना राष्ट्रवादीची कुमक होती. त्यामुळे त्यांना विजय सुकर झाल्याचे बोलले जात असले तरी भरणे यांची इंदापूरमध्ये ताकद आहे. २००९ मध्ये भरणे यांनी अपक्ष निवडणूक लढवत हर्षवर्धन यांना टक्कर दिली होती. त्यावेळी त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र २०१९ मध्ये राष्ट्रवादीने आघाडीतील ही जागा काँग्रेसला सोडल्यास भरणेंचा मतदार संघ कोणता असा प्रश्न उपस्थित होणार आहे. अशा स्थितीत भरणे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.