नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यास तयार असून, महाराष्ट्रात आता खरा रामभक्त व हनुमानभक्त कोण आहे, याची परीक्षा होण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत खासदार नवनीत राणा यांनी खुले आव्हान दिले आहे.
महाराष्ट्रात रामभक्त व हनुमानभक्तांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल होत आहेत, असा आरोप करून खासदार राणा म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारमधील लोकांना सदबुद्धी मिळावी, यासाठी आपण येत्या १४ मे रोजी दिल्लीतील कनॉट प्लेस भागातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करणार आहोत.
राजद्रोहाच्या गुन्ह्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे खासदार राणा यांनी स्वागत केले. ब्रिटिशकालीन कायदे बदलण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होत आहे. राजद्रोहाच्या कायद्याबद्दल केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेशी सहमत असल्याचे खासदार राणा यांनी सांगितले. जामीन रद्द करण्याबद्दल दिलेल्या कारणे दाखवा नोटीस उत्तर दिले जाईल. न्यायालयाच्या निर्देशांचे आपण उल्लंघन केले नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती आपण दिल्याचा दावा खासदार राणा यांनी केला.
शिवसेना नव्हे सुलेमान सेनाज्या तऱ्हेने मुख्यमंत्री रामभक्ती व हनुमानभक्तांवर अत्याचार करीत आहेत यातून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उरलेली नसून आता सुलेमान सेना झाली आहे, असा टोला आमदार रवि राणा यांनी लगावला.