जळगाव - बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी आम्हाला मोठे केले आहे. Who is Aaditya Thackeray? आम्ही गद्दार आहोत हे बोलण्याचा त्यांना काय अधिकार? गद्दारी तुम्ही केली. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याशी आघाडी केली. आम्ही तुमच्यामागे नतमस्तक होऊन गेलो. आम्ही तुमचं ऐकलं. परंतु आमदारांची कामे होत नव्हती. आम्ही तुमच्याकडे तक्रारी केल्या. परंतु त्याकडे लक्ष दिले नाही असा आरोप मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्या मतावर खासदार झाला. शिवसेना कुणाची काय, ती आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं. आम्ही आय लव्ह यू म्हटलं. काय वाईट केले आम्ही. शिवसेना आमचीच आहे. आम्ही बाळासाहेबांना सोडलं नाही. आनंद दिघेंना सोडलं नाही. आम्ही पक्ष सोडला नाही. आमच्या खांद्यावर भगवा झेंडा. जो आमच्यासोबत राहील तो आमचा. जो येतो तो टीका करतोय. आयुष्यभर संघर्ष केलेल्या माणसांवर बोलतायेत असा समाचार त्यांनी टीकाकारांचा घेतला.
तसेच परिणामांचा विचार करून राजकारण चालत नाही. संघर्ष जीवनाची यात्रा मानून वाटचाल करा. देव तुमच्या पाठिशी आहे. संघर्षाशिवाय तुम्ही मोठे होऊ शकत नाही. संघर्ष हे भविष्य आहे. कुणाला कुठल्याही पक्षाचं तिकीट दिलं तरी माणूस दर्जेदार लागतो. ५ लाख वाटून डिपॉझिट वाचवू शकत नाही. पक्षाचं योगदान निश्चित असते परंतु माणसालाही किंमत आहे असं सांगत गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाला टोला लगावला.
३२ वर्षाचं पोरगं गोधडीत होतं, ते आमच्यावर टीका करतंयदरम्यान, ३५ वर्ष आम्ही काय केले सगळ्यांना माहिती आहे. कुणी झेंडा लावायला तयार नव्हतं तेव्हा झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे, तडीपारी भोगणारे, जेलमध्ये जाणारे आम्ही आहोत. ३०२ आमच्यावर आहेत. ते ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे गोधडीत होता तो आमच्यावर टीका करतोय. तुम्ही संपत्तीचे मालक होऊ शकता परंतु विचारांचे वारस होऊ शकत नाही. विचारांचे वारसदार गुलाबराव पाटील आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत. तुमचं पक्षात योगदान काय आहे? उद्धव ठाकरेंचे चिरंजीव. उद्धव ठाकरेंना आमच्यावर बोलण्याचा १०० टक्के अधिकार परंतु आदित्य ठाकरेंचा मुळीच आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं.
त्याचसोबत टीका करणाऱ्याला करू द्या, परंतु इतिहासात आमच्या उठावाची नोंद होईल. आम्ही सांगून निघालो. हे सरकार वाचू शकलं असतं. परंतु चहापेक्षा किटली गरम अशी संजय राऊतांची भाषा होती. ३५ वर्ष एकच झेंडा, एकच मैदान, हिंदुह्द्रयसम्राट म्हणणाऱ्या आमच्यासारख्यांना तुम्ही दोष देता, टीका करता लाज वाटली पाहिजे. कोण संजय राऊत, जो एका वार्डातून निवडून आला नाही असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला.