पुणे - एकनाथ शिंदे यांच्या बंडात शिवसेनेचे तब्बल ४० आमदार सहभागी झाले त्यामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र दिसून आले. शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले ते गद्दारच आहेत अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बंडखोरांवर निशाणा साधत आहेत. त्याचसोबत राज्यात ठिकठिकाणी निष्ठा यात्रा काढून बंडखोरांवर घणाघात करत आहेत. आज पुण्यातील कात्रज चौकात तानाजी सावंत यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर आदित्य ठाकरे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यावरून तानाजी सावंत यांनी टोला लगावला आहे.
तानाजी सावंत म्हणाले की, हे शक्तिप्रदर्शन नव्हे तर शक्तीपात झाला आहे. शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे आली आहे. शिवसेना म्हणून एकही शिवसैनिक राहिला नाही. आदित्य ठाकरेंची शेवटची धडपड सुरू आहे. कोण आदित्य ठाकरे? काय संबंध? आदित्य ठाकरे हा एक आमदार आहे यापेक्षा फारसं महत्त्व देत नाही. आदित्य ठाकरे असो किंवा अन्य कुणी ज्यांनी सभा आयोजित केली असेल त्यावर मी लक्ष देत नाही असा टोला तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
आदित्य ठाकरे-एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावरएकाच शहरात ठाकरे-शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांची राज्यभरात निष्ठा यात्रा सुरू आहे. संध्याकाळी ते पुण्यात येतील. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रात सासवड येथे पहिली सभा होत आहे. या सभेला शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, सांगल्याचे आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित असतील अशी माहिती माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिली. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील कात्रज चौकात असलेल्या आमदार तानाजी सावंत यांच्या घरी भेट देणार आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे कात्रज येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.