मंत्रालयात बसलेला जनरल डायर कोण?; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस, अजितदादांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:33 PM2023-09-04T13:33:06+5:302023-09-04T13:34:40+5:30
लाठीचार्ज हा पोलिसांचा दोष नाही. वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय हा निर्णय पोलीस घेऊ शकत नाही. हा संवेदनशील विषय आहे. पोलिसांना वरून आदेश आले असा आरोप संजय राऊतांनी केला.
मुंबई – आरक्षणासाठी बैठका होत असतात पण मंत्रालयात बसलेला जनरल डायर कोण आहे? जालनात मराठा आंदोलक शांततेने आंदोलन करत होते. त्यांच्यावर गोळी चालवण्याचा, लाठीचार्ज करण्याचा, अश्रूधूर फोडण्याचा आदेश कुणी दिला? गृहमंत्री काय करतात, केवळ राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी, आवाज बंद करण्यासाठी यंत्रणेचा वापर केला जातो. अजित पवार कालपर्यंत मोर्चात सहभागी होत होते, आज कुठे आहेत? अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात जनरल डायरचं राज्य आहे. एक नव्हे तीन तीन जनरल डायर आहे. एक मुख्य जनरल डायर आणि २ डेप्युटी जनरल डायर आहे. जनरल डायरच्या मानसिकतेने राज्य सुरू आहे. जे विरोधात आहे त्यांच्यावर हल्ले करा, गोळ्या घाला किंवा पोलीस, तपास यंत्रणांचा वापर करून खोट्या गुन्ह्यात अडकवा. आमच्यासोबत जे आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या. पोलिसांना आदेश देणारा तो फोन मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कुणाचा होता? लाठीचार्ज हा पोलिसांचा दोष नाही. वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय हा निर्णय पोलीस घेऊ शकत नाही. हा संवेदनशील विषय आहे. पोलिसांना वरून आदेश आले, ही गोपनीयता पोलीस पाळतायेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा अडथळा येऊ नये म्हणून मराठा आंदोलन चिरडून टाका, मैदान साफ करा असा आदेश पोलिसांना दिला असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत दिल्लीचे अधिकार केंद्राच्या हातून जात होते, त्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती विधेयक आणले. मग संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यात मराठा आरक्षणासंदर्भात घटना दुरुस्ती करून न्याय मिळवून द्या. तुमच्या स्वार्थासाठी घटना दुरुस्ती करता. महाराष्ट्रात एक समाज रस्त्यावर उतरला आहे त्याच्यावर तुम्ही गोळ्या घालता, महिलांची डोकी फोडता मग या समाजाला घटना दुरुस्ती करून न्याय का देत नाही? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला.
ईडीग्रस्त लोकांना पद्म पुरस्कार देणार
ईडीने अजित पवारांबाबत काय केले? ते पाहा. कालपर्यंत ज्यांच्यावर धाडी घालत होता, गुन्हे दाखल करत होता. तपास सुरू होता. जरंडेश्वरवर जप्ती आली. आता गुन्हा मागे घेतला, जरंडेश्वर मोकळा झाला, चार्जशीटमधून नाव गायब झाले. हसन मुश्रीफ यांना ईडीवाले महात्मा पदवी देत आहेत. प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, किरीट सोमय्या, भावना गवळी, राहुल शेवाळे यांना २६ जानेवारीला पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रिटीश काळात रावसाहेब पदवी द्यायचे. आता या सगळ्यांना ईडीग्रस्त जे आहेत जे भाजपात गेले. त्यांना पुरस्कार मिळू शकतो असा टोला संजय राऊतांनी लगावला.