पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 03:29 PM2024-04-28T15:29:29+5:302024-04-28T15:30:14+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: राजकीय घडामोडींमुळे अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये एकटे पडल्याचं बोललं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण आहे, सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण आहेत आणि तटस्थ कोण आहेत याबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
यंदाच्या लोकसभा निवणुकीमध्ये बारामतील लोकसभा मतदारसंघात सर्वात लक्षवेधी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंब यांच्यात फूट पडल्यानंतर बारामतीमध्येशरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. मात्र या राजकीय घडामोडींमुळे अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये एकटे पडल्याचं बोललं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण आहे, सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण आहेत आणि तटस्थ कोण आहेत याबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, पवार कुटुंबामध्ये मी एकटा आहे, असं नाही, हेही समोर आले. जे राजकारणामध्ये नाही आहेत ते तटस्थ आहेत. यामध्ये आमचे थोरले बंधू राजेंद्र पवार यांचा परिवार, माझे धाकटे बंधून श्रीनिवास पवार यांचा परिवार आणि शरद पवार साहेबांचा परिवार हे तीनच परिवार एका बाजूला आहेत आणि माझा परिवार एका बाजूला आहे. आमचं पवारांचं कुटुंबं किती मोठं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे यामध्ये इतर कुणी तसा भाग घेतलेला नाही. दोघेही आम्हाला सारखेच अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तसेच राजकारण आमचा पिंड नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामागे काही आणखी कारणं आहेत, ती मी इथं सांगत नाही असे अजित पवार यांनी सांगितले.
इतकी वर्षे पवार कुटुंबातील सदस्यांसाठी पोल मॅनेजर म्हणून काम करत असताना कधी पवार कुटुंबाविरोधात जाऊन पत्नीसाठी पोल मॅनेजर बनावं लागेल, असं कधी वाटलं होतं का? असं विचारलं असता अजित पवार म्हणाले की, १९६२ ला असा प्रसंग पवार कुटुंबामध्ये उद्भवला होता. त्यावेळी आमचे थोरले काका दिवंगत वसंतदादा पवार हे शेतकरी कामगार पक्षाकडून बारामतीमधून पोटनिवडणूक लढवत होते. आमच्या आजी-आजोबांसह संपूर्ण कुटुंब त्यांचा प्रचार करत होतं. मात्र शरद पवारसाहेब तेव्हा काँग्रेसचा प्रचार करत होते. त्यावेळेस संपूर्ण परिवार एका बाजूला आणि एकटी व्यक्ती एका बाजूला असं चित्र होतं. त्यावेळी राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना हा इतिहास माहिती आहे. पण या गोष्टीला पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्याने आजच्या नवीन पिढीला हे माहिती नाही. त्याची फारशी चर्चा होत नाही. मी याचा उल्लेख केल्यावर काही जणांनी माहिती घेतली आणि त्यांना खरी माहिती समजली.