मुंबई - वाल्मीक कराड प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी पोपट घनवट यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर या प्रकरणी शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम यांनीही भाष्य करत जर पोपट घनवटचे वाल्मीक कराडशी कनेक्शन असेल तर त्याचे उबाठाशीही कनेक्शन आहे असा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी कमीत कमी १०० शेतकऱ्यांना फसवणूक त्यांच्या जमिनी हडप केल्याचा आरोप आव्हाडांनी केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, काही शेतकरी जिवंत असताना त्यांना मृत दाखवले, काहींना धमक्या देऊन त्यांच्या जमिनी लाटल्या. पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या त्या कोणाच्या ताकदीवर केले? हा घनवट कोणाचा पार्टनर आहे असं सांगत एका सुगर फॅक्टरीत घनवट वाल्मीक कराडचा पार्टनर आहे. फसवणूक झालेले शेतकरी विधान भवनाबाहेर उभे आहेत. घनवटची चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.
त्यावर पोपट घनवट दिंडोशीतील मोठा भूमाफिया आहे. त्यांचे माझ्याविरोधातील जे उबाठाचे उमेदवार आणि सध्याचे आमदार सुनील प्रभू त्यांचेही खास कनेक्शन आहे. वाल्मीक कराडचे पोपट घनवटशी कनेक्शन आहे तसं उबाठाशी कनेक्शन आहे. ज्या पोपट घनवटने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या तशाच्या दिंडोशी भागातील खासगी, शासकीय जमिनी कब्जा केल्यात. पोपट घनवट हा प्रत्येक निवडणुकीत सुनील प्रभूला मदत करतो, पैसेही देतो आणि मतदारांमध्ये जाऊन प्रभूंसाठी प्रचारही करतो असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
दरम्यान, जर जितेंद्र आव्हाड पोपट घनवटांचे धनंजय मुंडे यांच्याशी संबंध आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतात. तर पोपटचे उबाठासोबत काय कनेक्शन आहेत याचीही चौकशी झाली पाहिजे. दिंडोशीत त्याने अवैधपणे खूप मोठ्या प्रमाणात जमिनीवर कब्जा केला आहे त्याचीही चौकशी झाली पाहिजे. पुढील २-३ दिवसांत आम्ही यावर आंदोलन उभं करू असा इशाराही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरूपम यांनी मागणी केली आहे.