कालची ठाण्यातील ती उत्तर भारतीयांची सभा नव्हती, तर ती एक बैठक होती. कोण ती प्रियंका चतुर्वेदी ती भाषण करत होती. चतुर्वेदींबद्दल खैरेंनी काय म्हटले होते? आदित्य ठाकरेंनी तिचे सौंदर्य पाहून खासदार केलेय. संजय राऊत म्हणतात गद्दारांना उद्दवस्त करायचे तर आता उद्धव ठाकरे त्यांना उद्ध्वस्त करतील, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
दरवेळी पक्षातून लोक गेली की गद्दार गेले म्हणायची सवय आहे. परंतू, खऱ्या अर्थाने गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसैनिकांना दाबण्याचे काम त्यांनी केले आहे. आनंद दिघेंच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे यांचा कुटुंबातील एकही जण का उपस्थित नव्हता? त्यांना माहीत होते अंत्ययात्रेला गेलो तर लोक दगड मारतील म्हणून ते गेले नाहीत. तुम्ही दहा शिवसैनिकांचे नाव सांगावे की ज्यांना तुम्ही उभे केले, असे आव्हान उद्धव ठाकरे यांना शिरसाट यांनी दिले.
सत्तेची मजबुरी होती म्हणून तुम्ही काँग्रेसकडे गेलात हे तुम्ही काल सांगितले आहे. 2019 मध्ये शिवसेना भाजप युती म्हणून निवडणूक लढली आहे. स्वाभिमानी असाल तर त्यांनी राजीनामा द्यावा व जनतेच्या दरबारात जावे. दिघेंचा मृत्यू हा घातपाताने झाला आहे, हे सर्वांना माहिती आहे, ठाणेकरांनाही माहिती आहे. तुमच्या मांडीला मांडी लावून बसले तर तो पवित्र आणि तुमच्या विरोधात गेले की ते गद्दार कसे? उद्धव ठाकरे हे सध्या वैफल्यग्रस्त होऊन अशी विधाने करत आहेत, अशी टीका शिरसाट यांनी केली.
2024 मध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता येणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आता करो की मरो परिस्थिती आहे. अनेक मोठे नेते आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक आहेत, आता तर उद्धव ठाकरे यांनीच सांगितले जा म्हणून, कारण या नेत्यांनां ठाकरेंनी डस्ट बिनमध्ये टाकले आहे, असे शिरसाट म्हणाले. नवीन आलेल्यांना पंचपक्वान द्यायचे आणि जुन्या शिवसैनिकांना बाजूला करायचे असे सध्या ठाकरे गटात सुरु असल्याची टीका शिरसाट यांनी केली.