पनवेल – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा अधोरेखित केला. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तसेच कोकणात परप्रांतीयांनी लाटलेल्या जमिनीवरून त्यांनी निशाणा साधला. गोव्यात शेतजमीन बाहेरच्या लोकांना विकायची नाही असा कायदा तिथल्या मुख्यमंत्र्यांनी बनवला आहे. हा मुख्यमंत्री भाजपाचा, जो आमच्या गोव्याचे गुडगाव आण छत्तीसपूर होऊ देणार नाही असं विधान करतो. परंतु राज ठाकरे असं काही बोलला तर तो देशद्रोही ठरतो असं सांगत माझ्यासाठी पिढ्यानपिढ्या इथं राहणारा मराठीच आहे असं भाषणात म्हटलं. त्याचसोबत मनसेच्या एका तालुकाध्यक्षाचाही उल्लेखही केला.
राज ठाकरे म्हणाले की, आपण महाराष्ट्रातली जमीन विकतोय, तिकडे प्रकल्प येत आहेत किंवा येतील पण... पण तिथल्या जमिनी ह्या परप्रांतीयांनी घेतल्या आहेत आणि तिकडे फायदे कोणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार. मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. माझा मंडणगडचा अध्यक्ष तर एक पंजाबी आहे असं त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी उल्लेख केलेला मंडणगडचा तालुकाध्यक्ष ज्याचे नाव नवज्योत सिंग गौड असं आहे. या भाषणात राज ठाकरे यांनी नवज्योतला उभं करून त्याचे कौतुक केले. याबाबत नवज्योत सिंग गौड म्हणतो की, महाराष्ट्रात एवढे जिल्हे, तालुके आहेत. इतकी लोकसंख्या आहेत. त्यात एक मंडणगड तालुका, जो ग्रामीण आणि छोटा तालुका आहे. त्यात माझ्या नावाचा उल्लेख साहेबांनी केला त्याचा मला अभिमान वाटतो. मला बोलण्यासाठी शब्दही सुचत नाहीत. माझा जन्म महाराष्ट्रात झाला. जो परप्रांतीय टॅग लागलेला तो साहेबांमुळे दूर झाला. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यालाही साहेब इतकं मोठं व्यासपीठ देतात, राज ठाकरेंसारखा नेता देशात असेल वाटत नाही असं त्याने सांगितले.
तसेच २०१० पासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करतोय. तेव्हा मी शाळेत होतो. मनसेच्या विद्यार्थी सेनेत मी काम करत होतो असं त्याने सांगितले. तसेच राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावर आता मनसे स्टाईल आम्ही आंदोलन करू. जो कोणी खड्ड्यांसाठी जबाबदार आहे, मग तो ठेकेदार असो, शासकीय अधिकारी अथवा अन्य कोणी आम्ही त्याला खड्ड्यात बसवल्याशिवाय राहणार नाही. जनतेने सर्वांवर विश्वास ठेवलाय आता मनसेला एक संधी देऊन पाहा. लोकांची समस्या सोडवण्याचे काम राज ठाकरेच करू शकतात असा विश्वास नवज्योत सिंग गौड यांनी व्यक्त केला.