मुंबई - मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ४ अज्ञात इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर देशपांडे यांच्यावर सध्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या हल्ल्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे आरोपी कोण आहेत याचा शोध पोलीस घेतील असं भाजपा नेते आशिष शेलारांनी म्हटलं तर कोण संदीप देशपांडे, कुठे असतात असं खोचक विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर कोण संदीप देशपांडे? कुठे असतात असं राऊतांनी विचारलं. राऊत म्हणाले की, मला हल्ल्याची माहिती नाही. कुठल्याही नागरिकावर महाराष्ट्रात अशारितीने हल्ला होणे हे कायदा व सुव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही. कुणीही असेल सामान्य माणूस असेल, राजकीय नेते असतील त्यांना धमक्या देणे, त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलणे अशाप्रकारे सनसनाटी निर्माण करणे त्यामुळे अशा हल्लेखोरांना बळ मिळते असं त्यांनी सांगितले.
तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था अजिबात नाही. जिथे निवडणुका असतील तिथे कायदा सुव्यवस्था हातात घेऊन आपल्या सोयीनुसार गृहमंत्री तिथे जातात आणि संपूर्ण कायदा हातात घेऊन तो आपल्या पक्षासाठी राबवतात. पोलीस यंत्रणाही अशारितीने वागत असतील तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल असा इशाराही संजय राऊत यांनी सरकारला दिला.
ठाकरे कुटुंबीयांनी घेतली भेट सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर ४ अज्ञात इसमांनी हल्ला केला. क्रिकेटच्या स्टंम्पने हा हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या देशपांडे यांच्यावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यात देशपांडे यांच्या हाताला फ्रॅक्चर, पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही रुग्णालयात पोहचल्या होत्या.