उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर नारायण राणे यांनी कोण संजय राऊत, मी ओळखत नाही. कोणत्यातरी प्रतिष्ठित माणसाचे नाव घ्या, असे सांगत धुडकावून लावले आहे.
संजय राऊतांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला मग काय झाले. भांडूपच्या कोणत्याही निवडणुकीत मी गेलोच नाही. निवडणुकीसाठी खर्च केला असे बोललो नाही. संजय राऊतच्या प्रश्नावर सांगलीला येऊन का उत्तर देऊ. इथे अनेक विषय आहेत. यामुळे मी राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही, असे राणे म्हणाले.
राज्यात येत्या काही दिवसांत राजकीय भूकंप होतील असे सारे नेते सांगत आहेत. यावर राणेंना विचारले असता, अदानी, शरद पवार कसे काय राजकीय भूकंप करतील, तशी शक्यता राज्यात नाहीय. पाच वर्षे सरकार टिकेल एवढी क्षमता सरकारमध्ये आहे. संयुक्तपणे आमचे सरकार चांगल्या प्रकारे सुरु आहे, असे राणे म्हणाले. राणे भांडूपमध्ये काय म्हणालेले... आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी खर्च केला होता. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, असे वक्तव्य राणे यांनी भांडूपमध्ये केले होते. याविरोधात राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात राणेंना नोटीस पाठविली होती. राणे यांनी पुराव्यानिशी हे दावे सिद्ध करावेत, असे यात म्हटले होते. राणे यांच्याकडून या नोटीशीला उत्तर देण्यात आले नाही. यामुळे राऊत यांनी मुलुंडच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.