मुंबई - अजित पवार यांच्याबाबतच्या चर्चांना स्वत: अजितदादांनी खुलासा करत स्पष्टीकरण दिले. पण त्यावेळी अप्रत्यक्षपणे दादांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना इशारा दिला होता. तुम्ही तुमच्या मुखपत्राबद्दल बोला, राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांची बाजू मांडायला सक्षम आहेत असं म्हटलं. संजय राऊत यांच्या रोखठोक सदरावरून हा वाद पेटला होता. त्यानंतर अजित पवारांच्या टीकेला संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले होते.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार विरुद्ध संजय राऊत असा वाद चालला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत होते. आज पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवारांनी थेट कोण संजय राऊत अशा शब्दात त्यांनी फटकारलं. आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. राऊत म्हणाले की, राष्ट्रवादीच्या शिबिरात कोणाला बोलवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांच्या पक्षात काय चाललंय त्यावर का बोलू? महाविकास आघाडीबाबत काही असेल तर मी बोलेन. मी महाविकास आघाडीतील अस्वस्थतेवर बोलतो. मी इतर पक्षांबाबत कधी मत व्यक्त करत नाही जोवर महाविकास आघाडीला तडे जात नाहीत. माझा संबंध महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या सर्व समन्वयाशी आहे. त्यामुळे काँग्रेस असो वा राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत प्रश्नावर मी बोलत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच परवाच अजित पवार आणि मी एकत्र टेबलावरून बसून जेवलोय, छान जेवलो. अजित पवार ही स्वीट डिश, गोड माणूस आहे. अजित पवार यांच्यावर सर्व प्रेम करतात. त्यांना रागवू द्या, माणसाने मन मोकळे केले पाहिजे. माझा आणि अजित पवारांचा कधी वाद नव्हता. पवार कुटुंबातील कोणशीही माझा कधीच वाद नव्हता आणि नाही. अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत. भाजपा लावालावी करत असेल तर तुमचा डाव यशस्वी होणार नाही असा इशारा संजय राऊतांनी भाजपाला दिला.
दरम्यान, खारघरच्या त्या कार्यक्रमात नक्की काय घडले त्यावर आम्ही बोलतोय हा मुद्दा आहे. त्यात ५० साधकांचा मृत्यू झाला आहे त्याची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी. अजितदादा म्हणतात न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. त्याचसोबत नाना पटोले म्हणतायेत या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, तेदेखील बोलवायला हवे अशी मागणी संजय राऊतांनी केली. त्याचसोबत पाचोरा येथील उद्धव ठाकरेंच्या सभेला मंत्री गुलाबराव पाटलांनी इशारा दिला त्यावर राऊतांनी केला इशारा जाता जाता...शिवसेना ही चौकट सोडूनच काम करते असा पलटवार केला.