समस्त पुणेकरांना लाजवेल असे कृत्य शनिवारी सकाळी समोर आले होते. बड्या बापाच्या मुलाने लक्झरी गाडी रस्त्यावर मधोमध उभी करून सिग्नलवर लघुशंका केली होती. तसेच त्याला हटकणाऱ्यांना महिलांसमोर अश्लिल हावभाव करत पलायन केले होते. या माजलेल्या तरुणाने पुण्यात सरेंडर न होता साताऱ्यात सरेंडर होण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी जारी केलेल्या व्हिडीओत त्याने शिंदे साहेबांचे नाव घेतले, हे शिंदे साहेब कोण असा सवाल पुणेकर विचारत आहेत.
हा मद्यधुंद तरुण गौरव आहुजा आहे, त्याचे आणि त्याच्या वडिलांची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप आपचे नेते विजय कुंभार यांनी केला आहे. पोलिसांनी त्याचे वडील मनोज आहुजा यांना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांनी आपल्या मुलाने सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली असे म्हटले होते. यावरही कुंभार यांनी मनोज आहुजांचे मगरीचे अश्रू असल्याची टीका केली आहे.
या आहुजा घराण्याच्या तीन पिढ्यांनी बेकायदेशीर लॉटरी व्यवसायातून पैसा कमावलेला आहे. गौरववर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचे वडील मगरीचे अश्रू ढाळत आहेत, तर या गुन्हेगार कुटुंबाबद्दल कोणाला सहानुभूती वाटली पाहिजे का? असा सवाल कुंभार यांनी केला आहे.
मी गौरव आहुजा, माझ्याकडून आज सकाळी पुण्याच्या रस्त्यावर कृत्य घडलं. हे कृत्य खूप वाईट होतं. मी मनापासून माफी मागतो. संपूर्ण जनता आणि शिंदे साहेब यांची मनापासून माफी मागतो, असे आहुजाने व्हिडीओत म्हटले आहे.
आरोपी गौरव आहुजा हा फक्त देशाची, जनतेची माफी मागत नाहीय तर तो खासकरून शिंदे साहेबांचीही माफी मागत आहे. हे शिंदे साहेब नेमके कोण, त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे का, या शिंदे साहेबांनी आहुजाला वाचवण्यासाठी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली आहे का, या प्रकरणात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा कोण?
फेब्रुवारी 2021 मधे गौरव ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रिकेट बेटींगच्या गुन्ह्यात अटक केली होती. क्रिकेट बेटिंगमधे एक हाय प्रोफाइल रँकेट बस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आले होते. या टोळीने कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगमध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गौरव अहुजा , सुनिल मखीजा तसेच अजय शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मिडिया सकाळपासून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे गौरव आहुजा पुन्हा चर्चेत आला आहे.