नवाब मलिक, अनिल देशमुखांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार असे ट्विट भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केले आणि राज्यात पुन्हा चर्चा सुरु झाली. हा नेता कोण? सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून हे ट्विट करण्यात आले होते. आता हा नेता कोण? अशी चर्चा सुरु झालेली असताना मोठी माहिती समोर येत आहे.
अडीज वर्षांपूर्वी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जात राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. पहाटेच शपथविधी उरकून अजित पवार आणि फडणवीसांनी नवे सरकार स्थापन केले होते. यानंतर लगेचच अजित पवारांविरोधातील सिंचन घोटाळ्यात तपास यंत्रणांनी क्लिनचिट दिली होती. यामध्ये या घोटाळ्याशी अजित पवारांचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. यावर मोठा गौप्यस्फोट अडीज वर्षांनी झाला आहे. अजित पवारांना तपास यंत्रणांनी क्लिचिट दिलेली असली तरी तो अहवाल उच्च न्यायालयाने स्वीकारलेला नाही, असे समोर आले होते. यामुळे अजित पवारांविरोधात सिंचन घोटाळ्याप्रकरणी टांगती तलवार कायम आहे.
यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे हे कारस्थान आहे. ते नेहमी अशीच कारस्थाने करत असतात. सिंचन घोटाळ्याचा आकडा फसवा होता. उच्च न्यायालयाने अहवाल स्वीकारला की नाही याची राष्ट्रवादीला कल्पना नव्हती, असे म्हटले आहे. तर सिंचन घोटाळ्याविरोधात आवाज उठविणाऱ्या अंजली दमानिया यांनी क्लिनचिट ही केवळ राजकीय होती, त्यापेक्षा ही फाईलच बंद करून टाका. आमच्यासारखे लोक धाडस करून न्याय मागतात, परंतू त्यांना फिरतच बसावे लागते, हाती काहीच लागत नाही, अशी नाराजी दमानिया यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
यापूर्वी ज्यांच्या अटकेची भविष्यवाणी मोहित कंबोज यांनी केली होती, ते आज अटकेत आहेत. यामुळे त्यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिसरा नेता कोण असणार? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. विशष म्हणजे, मोहित कंबोज यांनी हे ट्विट अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केल्याने याची अधिक चर्चा होत आहे. त्यांचे हे ट्विट दबाव निर्माण करण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्नही रजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.