राष्ट्रवादीला सांगतो बदमाश गुन्हेगाराला माझ्या अंगावर घालून कुभांड रचून आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न करत असाल तर हे यशस्वी होणार नाही. निश्चितपणे रयत क्रांती संघटना याचा मुकाबला करेल. २१, २२ जूनला राज्यव्यापी कार्यकारिणीची बैठक बोलविली आहे. संघर्ष अटळ आहे, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.
गुन्हेगाराला समोर उभे करू नका, हिंमत असेल तर मैदानात समोर या, मी त्या हॉटेल मालका शिनगारेवर गुन्हा दाखल केला आहे. एक कलम लावायला हवे होते. पोलिसांनी त्या गुन्हेगाराची पाठीमागची कारकीर्द शोधावी. त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहे.
यामागे लाल टॉमेटो सारखे गाल असलेला नेता कोण आहे त्याचे नाव वेळ आली की सांगेन. आजपासून त्याचे बगलबच्चे बोलायला लागतील, त्यावरून तो कोण हे समजेल. अजून काही लोक त्याठिकाणी होते. या लोकांनी मी ओळखतो. वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावत नाही, तो ज्याने दगड मारलाय त्याचा घोट घेतो, कुत्रा दगड मारणाऱ्याला चावतो. माझ्या जिवाला पवार कुटुंबापासून धोका आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा गंभीर आरोप खोत यांनी केला आहे.
राष्ट्रवादी या पक्षापासून माझ्या जिवाला धोका आहे, हे मी लेखी कळवणार आहे. पवार कुटुंबाकडून धोका आहे. सदाभाऊचा प्राण गेला तरी चालेल परंतू त्यांची ही व्यवस्था, वाडा नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप केला आहे. तो हॉटेलमालक त्याला जेवढे सांगितले जायचे तेवढेच बोलत होता. मला गावातील लोकांचे फोन आले आणि तो किती भामटा आहे, वाळू माफिया आहे हे त्यांनी सांगितले, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.