भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे पवार घराण्यावर खालच्या थरावर जाऊन टीका करत आले आहेत. यापूर्वी शरद पवारांवर अशाच खालच्या शब्दात केलेल्या टीकेप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पडळकरांना शब्दांची मर्यादा पाळण्याची सूचना दिली होती. आता तर भाजपबरोबर असलेल्या आणि सरकारबरोबर असलेल्या अजित पवारांवर पडळकर यांनी टीका केली आहे. फडणवीसांनी या टीकेबद्दल पडळकरांना समज दिली असताना भाजपचे दुसरे आमदार नितेश राणे यांनी पडळकरांची पाठराखण केली आहे. त्यामुळे अजितदादांवरील टीकेमागे बोलवता धनी भाजपमध्येच असावा, असा संशय अजितदादा गटाला आहे.
साहेब, आमचाही सत्कार करा...
मुं बई पोलिस दलात चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे कायदा व सुव्यस्थेचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयात बोलावून सत्कार करण्यात येतो. सत्कारासाठी रिपोर्ट वेळेत न मिळाल्याने चांगली कामगिरी करणाऱ्या पथकाला सॉरी, नेक्स्ट टाइमचा संदेश मिळतो. उपनगरातील एका पोलिस ठाण्याला नुकतीच याची प्रचिती आली. अनेक सायबर गुन्ह्यांचा निपटारा या पोलिस ठाण्याने केला आहे. नुकतेच सव्वा कोटी गोठविण्यास त्यांना यश आले. मात्र, कामगिरीचा अहवाल वेळेत न आल्याने त्यांची संधी हुकली. अहवालापेक्षा खरच एखाद्याच्या कामगिरीचा लेखाजोखा ठेवून सत्कार झाल्यास काम करणाऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल, अशीही कुजबुज पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असल्याचे दिसून आली.
कंत्राटी भरतीचे ‘लाड’ कुणासाठी?
महाराष्ट्र शासन आता कंत्राटी तत्त्वावर नोकरीभरती करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी तिचे समर्थन करून यातून शासनाचा मोठा निधी वाचणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, शिंदे सरकारच्या या निर्णयावर कामगार क्षेत्रातून टीका होऊ लागली आहे. कारण महाराष्ट्र शासन कंत्राटी नोकर पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांना १५ टक्के सेवा शुल्क देणार आहे. एखाद्या कंत्राटीला १० हजार रुपये वेतन दिले तर त्यापैकी १५०० रुपये त्या कंपनीच्या घशात जाणार आहेत. म्हणजे समजा शासनाने वर्षभरात १०,००० कोटींचे पगार वाटप केले तर ती कंपनी १५०० कोटींचा मलिदा खाणार आहे. यामुळे सरकार हा हजारो कोेंटीचा ‘प्रसाद’ कोणाला देणार आहे, कोणासाठी शिंदे सरकारने हे ‘लाड’ चालविले आहेत, अशी कुजबुज कामगार क्षेत्रात सुरू झाली आहे.