लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याच्या निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत सध्या जोरदार चर्चा आहे. विद्यमान मुख्य आयुक्त यूपीएस मदान यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबरला संपणार आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची या पदावर नियुक्ती केली जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. माजी मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य आयुक्त राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे हेही स्पर्धेत असल्याचे म्हटले जाते. या पदासाठी जवळपास १२ आजी-माजी आयएएस, आयपीसएस अधिकाऱ्यांनी अर्ज केले आहेत.
निवडणूक आयुक्त पदासाठीच्या नावाची शिफारस राज्य सरकार हे राज्यपालांकडे करते आणि राज्यपाल नियुक्ती करतात अशी पद्धत आहे. सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती ३० जून २०२४ रोजी करण्यात आली होती. त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत.
- मनोज सौनिक आहेत महारेराचे अध्यक्ष- मुख्य सचिव पदावर येऊन दोन महिनेही व्हायचे असताना आता त्या निवडणूक आयुक्त होणार असल्याची आयएएस लॉबीमध्ये जोरदार चर्चा आहे. या पदाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक हेही राज्याचे मुख्य सचिव होते. निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती १७ जुलै रोजी महारेराच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे.
१० महिन्यांचा कार्यकाळ बाकी
- सुजाता सौनिक यांचा मुख्य सचिवपदाचा १० महिन्यांचा कार्यकाळ अद्याप बाकी आहे. निवडणूक आयुक्तपदी साधारणतः निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते.
- सध्याचे आयुक्त मदान हे राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार म्हणूनच नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर काहीच दिवसात ते आयुक्त झाले होते.
- सुजाता सौनिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ जून २०२५ पर्यंत आहे. याचा अर्थ त्या आणखी १० महिने या पदावर राहू शकतात. हा १० महिन्यांचा कार्यकाळ सोडून पाच वर्षांसाठी निवडणूक आयुक्तपद त्या स्वीकारतील का हा प्रश्न आहे.
- तथापि, त्या निवडणूक आयुक्त झाल्या तर या पदावर येणाऱ्या त्या दुसऱ्या महिला असतील. या आधी नीला सत्यनारायण यांनी २००९ ते २०१४ दरम्यान हे पद भूषविले होेते.