Sharad Pawar: पिक्चर अभी बाकी है! राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे? शरद पवारांकडे प्लॅन-बी तयार, अशी फिरणार भाकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:41 AM2023-05-03T10:41:23+5:302023-05-03T10:42:10+5:30
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आता पक्षाचा भावी प्रमुखाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आता पक्षाचा भावी प्रमुखाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकीकडे पक्षाची संपूर्ण जबाबदारी ही अजित पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत प्लॅन बी तयार आहे. त्यानुसार सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांनाही जबाबदारी मिळू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवले जाऊ शकते. तर अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. दोघांमध्ये कुठलेही मतभेद होऊ नयेत. त्यांना आपल्या आपल्या कामाचा निर्णय घेता यावा, राष्ट्रीय पातळीवर सुप्रिया सुळे यांना निर्णय घेता यावेत आणि राज्य पातळीवर अजित पवार यांना जबाबदारी सांभाळता यावी, म्हणून असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. २०२४ च्या लोकसबा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी उचललेल्या या पावलाचा परिणाम राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येणार आहे. शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांच्या समितीची बैठक झाली. त्यानंतर अजित पवार यांनी सांगितले की, शरद पवार यांना आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांची वेळ हवी आहे, त्यामुळे आता पवार काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.