मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणातील आरोपींचं अटकसत्र सुरू झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही धार आली आहे. दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी ऋषिकेश बेरदे या बीड जिल्ह्यातील तरुणाला अटक केल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणे यांनी ऋषिकेश बेरदे याचा शरद पवारांसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जालन्यातील घटनेवरून आरोप करताना नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, "दगडफेकीच्या मास्टरमाइंडमागे कुणाचा हात? अंतरवाली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे याने शरद पवार आणि राजेश टोपेंची भेट घेतली होती. १ सप्टेंबर रोजी पोलिसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत ही भेट झाली," असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तसंच पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला होता? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? असे सवालही नितेश राणे यांनी विचारले आहेत.
दरम्यान, नितेश राणे यांच्याकडून करण्यात आलेल्या या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कसे प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोण आहे ऋषिकेश बेरदे?
ऋषिकेश बेरदे हा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. सध्या अजित पवार गटात असलेल्या विजयसिंह पंडित यांचा तो निकटवर्तीय समजला जातो. बेदरे याच्या अटकेनंतर विजयसिंह पंडित यांनी फेसबुक पोस्ट लिहीत प्रशासनाचा निषेध केला होता. "मराठा आरक्षणासाठी लढणारा आमचा ढाण्या वाघ, माझे छोटे बंधू ऋषिकेशदादा बेद्रे यांना आज अचानक केलेली अटक ही अतिशय दुर्दैवी असून याबाबत आम्ही नक्कीच प्रशासनाला जाब विचारू," अशी आक्रमक भूमिका पंडित यांनी घेतली होती.
नितेश राणे यांनी ऋषिकेश बेदरे प्रकरणावरून शरद पवारांना लक्ष्य केल्यानंतर त्यांच्या गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी बेदरे याचे अमरसिंह पंडित यांच्यासोबतचे फोटो शेअर करत तो अजित पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आगामी काळातही राजकारण तापण्याची शक्यता आहे.